आज दि. ७ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

टेलिमेडिसीन सेवा विस्ताराची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना, आतापर्यंत ६७ लाखाहून अधिक रुग्णांना लाभ!

ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी सुमारे दीड दशकापूर्वी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमेडिसीन उपक्रमाचा, तसेच इ – संजीवनी योजनेचा व्यापक विस्तार करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य विभागाच्या या दोन योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत ६७ लाख ४४ हजार ३८३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.आगामी काळात टेलिमेडिसीन आरोग्य सेवेचा प्रभावी विस्तार करून किमान दोन कोटी रुग्णांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, असा आमचा संकल्प असल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारत आणि इस्राईल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाची नुकतीच यशस्वी चाचणी केली. नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौकेवरुन ही रात्रीच्या सुमारास चाचणी घेण्यात आली. यावेळी हवेतील एका लक्ष्याचा भेद करत असल्याचा व्हिडीओ नौदलाने प्रसिद्ध केला आहे.जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राला तांत्रिकदृष्ट्या MR-SAM म्हणजेच medium range mobile surface to air missile म्हंटलं जातं, नौदलाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे Barak 8. नौदलाचे हे एक प्रमुख क्षेपणास्त्र असून यामुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडली आहे.

IPL 2023 : ‘नया रंग, नया अंदाज’ म्हणत लखनौ सुपर जाएंट्सच्या नव्या जर्सीचे अनावरण

आयपीएल 2023 च्या हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने आज आपल्या नव्या जर्सीचे अनावरण केले.लखनौ संघाची ही नवी जर्सी गडद निळ्या रंगाची असून जर्सीच्या अनावरण सोहोळ्यावेळी संघाचा कर्णधार केएल राहुलसह दीपक हुड्डा आणि जयदेव उनाडकट हे देखील उपस्थित होते.लखनौ सुपर जायंट्सची नव्या जर्सीचे अनावरण होताच ती सगळीकडे व्हायरल देखील झाली. अनेक चाहत्यांनी नव्या जर्सीची तुलनाडेक्कन चार्जर्सच्या जर्सीशी केली आहे.लखनौने त्यांच्या जर्सीवर पारंपरिक निळा रंग आणि त्यात साईड पॅनलला लाल रंगाच्या छटा वापरल्या आहेत.

पुढील महिन्यात आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासारख्या खगोलीय घडामोडी नेहमीच आपल्या मनात आकर्षण आणि कुतूहल निर्माण करतात. ग्रहणाच्या घटनेला ज्योतिषशास्त्रात आणि खगोलशास्त्रात सारखंच महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. त्यामुळे असं मानलं जातं की, ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही. पण, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा नक्कीच वाईट परिणाम होतो.

2023 मधील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल (गुरुवार) रोजी होणार आहे. या ग्रहणाचा सुतक कालावधी, ग्रहणाचा प्रकार आणि ग्रहणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हनुमानाच्या पुतळ्यासमोर महिला बॉडी बिल्डर्सचा रॅम्प वॉक! भाजपा-काँग्रेसमध्ये रंगला वाद

भारतीय जनता पार्टी (भाजपा) हा राजकीय पक्ष नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करत आला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपानं अनेकदा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका केलेली आहे. मात्र, या वेळी भाजपा स्वत:च एका वादात सापडला आहे आणि काँग्रेसने हिंदुत्वावरून भाजपची कोंडी करण्याची  संधी सोडलेली नाही.

भाजपानं मध्य प्रदेशमध्ये आयोजित केलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेनंतर हा वाद सुरू झाला आहे. भाजपानं आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये, अतिशय कमी कपडे घातलेल्या महिला स्पर्धकांनी हनुमानाच्या पुतळ्यासमोर पोज दिल्या. यामुळे हिंदू धर्म आणि हिंदू देवता हनुमानाचा अपमान झाला आहे, असं म्हणत काँग्रेसनं भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

‘या’ शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी फक्त महिलाराज

आज धुलीवंदनाचा दिवस आहे. सर्वत्र मोठ्या उत्साहात धुलीवंदन आणि होळी साजरी होत आहे. यंदा होळीच्या दुसऱ्याच दिवशी महिला दिन देखील आला आहे. आज आपण एका अनोख्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये असं एक गाव आहे, ज्या गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी केवळ महिलांचं राज्य असतं. महिलांचा आदेश हा पुरुषांसाठी बंधनकारक असतो. उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात या प्रथेचं पालन केलं जातं.उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये ब्रज प्रथेचं पालन करण्याची परंपरा आहे. जिल्ह्यात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक समाजाच्या होळीशी संबंधित आपल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. अशीच एक अनोखी परंपरा पीलीभीत जिल्ह्यातील माधोटांडा परिसरामध्ये पहायला मिळते. या परिसरात होळीच्या दुसऱ्या दिवशी महिला राज पहायला मिळते.या दिवशी महिला टोळी टोळीने गावात फिरतात. तसेच रस्त्यावर जोरदार जल्लोष करतात. यावेळी महिला होळीशी संबंधित पारंपरिक गिताचे गायन देखील करतात. तसेच रस्त्याने जात असलेल्या व्यक्तींकडून पैसे देखील वसूल केले जातात. त्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या रस्त्यावर एकही पुरूष दिसत नाहीत. सर्व पुरूष हे आपल्या घरामध्ये बसतात तर रस्त्यावर महिलाराज पहायला मिळते.

शेतीचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांनी हिसकावून नेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश दिले आहे.

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसंच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. या दृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

हौस म्हणून शिक्षकानं मुलाच्या वाढदिवसाला कापला चक्क 221 किलोचा केक

हौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही खोट नाही. याची प्रचिती वसईतल्या एका वाढदिवसानिमित्त आली आहे. मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी तब्बल 221 किलोचा केक तयार करुन घेतला. एवढंच नाही तर वडिलांनी मुलाच्या आवडत्या गाडीचा आकाराचा हा केक बनवून घेतला. सध्या या केकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

वसईत पूर्वे कडील कामण गावातील नवीत भोईर हे जिल्हापरिषद शाळेत शिक्षक असून त्यांना लग्नाच्या 6 वर्षा नंतर रेयांश याचा जन्म झाला. त्या नंतर तो एक महिना आयसीयुत उपचार घेत होता. आपल्या मुलाच बारस थाटामाटात करायचं होत मात्र आजारपणामुळे तो करता आला नाही. त्यामुळे रेयांश आजारातून बरा झाल्यानंतर नवीत यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं. विशेष म्हणजे मागीलवर्षी रेयांशच्या पाहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी रेयांशला मुंबईहून हेलिकॉप्टमधून आणण्यात आले होते.

उड्डाण होताच काही सेकंदात स्वतःचेच रॉकेट जपानने केले नष्ट

अमेरिकेतील स्पेस एक्स कंपनीने उपग्रह पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचा – प्रक्षेपकाचा पुर्नवापर करत अवकाश मोहिमा स्वस्त केल्या आहेत, उपग्रह प्रक्षेपणा मोहिमांना आता जगात स्पर्धेचे स्वरुप आणले आहे. तेव्हा या स्पेस एक्सला टक्कर देण्यासाठी जपानच्या अवकाश संस्थेने ( Japan Aerospace Exploration Agency -JAXA ) H3 हे रॉकेट विकसित केले होते.नियोजित वेळेनुसार H3 रॉकेटचे उड्डाण झालेही, पहिला टप्पा सुरळीत पार पडला, मात्र पहिला टप्पा संपल्यावर साधारण ३९० किलोमीटर उंचीवर दुसऱ्या टप्पा सुरु होणे आवश्यक होते, मात्र ही प्रक्रिया सुरुच झाली नाही, तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे रॉकेटचा उर्वरित भाग आणि त्यावर आरुढ असलेला उपग्रह असं सर्व हे अवकाशात पृथ्वीभोवती भरकटण्याची शक्यता होती किंवा अशा निकामी झालेल्या रॉकेटचे तुकडे पृथ्वीभोवती वेगाने काही तास फिरल्यावर पृथ्वीवर कोसळण्याची भिती होती. त्यामुळेच जपानच्या अवकाश संस्थने हे रॉकेट नष्ट करण्याचा निर्णय घेतला. रॉकेटवरील संगणकाला तशा सुचना देत हे रॉकेट नष्ट करण्ण्यात आले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.