महिला प्रीमियर लीगमधील चौथा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेल. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने बंगळुरु ९ गडी राखून मोठा विजय नोंदवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने १४.२ षटकात १ बाद १५९ धावा करत विजय मिळवला. या स्पर्धेतील मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे.
मुंबईकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ७७ धावा केल्या. त्याचबरोबर नॅट सिव्हरने ५५ धावांची नाबाद खेळी केली. मुंबईचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईचे दोन सामन्यांनंतर चार गुण झाले आहेत, तर आरसीबीने सलग दुसरा सामना गमावला आहे.
हेली मॅथ्यूजला मिळाला सामनावीराचा पुरस्कार –
हेली मॅथ्यूजने प्रथम गोलंदाजी करताना ४ षटकांत २८ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर फलंदाजी करताना ३८ चेंडूचा सामना करताना नाबाद ७७ धावा केल्या. तिने या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच नॅट सायव्हर-ब्रंटसोबत दुसऱ्या विकेट्ससाठी नाबाद ११४ धावांची शान दार भागादारी केली. नॅट सायव्हर-ब्रंटने २९ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. ज्यामध्ये ९ चौकार आणि एका षटकारचा समावेश होता.
आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली. सोफी डेव्हाईन आणि कर्णधार स्मृती मंधाना यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर संघ चार धावांत चार विकेट गमावून बॅकफूटवर आला. सायका इशाक आणि हीदर नाइट यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत सामन्यात मुंबईची पकड मजबूत केली.
मात्र, आरसीबीच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळणे सुरूच ठेवले. रिचा घोष २६ चेंडूत २८, कनिका आहुजाने १३ चेंडूत २२, श्रेयंका पाटीलने १५ चेंडूत २३ धावा केल्या. अखेरीस, मेगन शुटने १४ चेंडूत २० धावा करत संघाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली.मुंबईकडून हिली मॅथ्यूजने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी सायका इशाक आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नॅट सिव्हर आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तथापि, नॅट शिव्हर आणि जिंतीमणी कलिता यांनी १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.