महाराष्ट्राने ई-बाईक धोरण राबविले आहे. महाराष्ट्र नेहमीच नव्या गोष्टी राबविण्यात पुढाकार घेत असतो, असं सांगतानाच एखाद्या गाडीला चार्जिंग करायला चार तास लागले तर बाकीच्यांनी काय झोपा काढायच्या का?, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार हे पुण्यात बोलत होते. आता पुढचा जमाना ई-बाईकचा आहे. सायकलचं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र आता सर्वात जास्त दुचाकीचे शहर झालं आहे. आता ई- बाईकचे शहर म्हणून पुणे नावारूपाला आलं तर वावगं वाटायला नको, आणि ते येणारच, असं अजित पवार म्हणाले.
देशभरात डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत. इलेक्ट्रिक्ट पीएमपी बसेस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सीएनजी किंवा इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा आदेश दिलेला आहे. आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. आपलं पुणे प्रदुषण मुक्त झाले तर इतरांची मने जिंकता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहन येत आहेत. प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. लोकं सांगतात कधीतरी इंधनाचा साठा संपणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
वाहने चालवताना फार स्पीडने जाऊ नका, हात पाय मोडून घेऊ नका. मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, मात्र पुणेकर माहितीय कुणाचं ऐकतोय, असं मिष्किल भाष्य त्यांनी केलं. राज्य सरकार केंद्र सरकारला ई-बाईकला अनुदान देत असते. पुणेरी ग्राहक हा चौकस बुद्धीचा आहे. कितीही प्रश्न विचारेलत तरी शांतपणे त्याच्याशी बोला. लोकांना पटायला थोडा वेळ लागतो. पण एकदा मनात बसले की पसरायला वेळ लागत नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी सकाळी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने 1 कोटी 17 लाख लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही ते म्हणाले.