ज्ञानवापी मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे कोर्टाकडून आदेश
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगावरून देशभरात चर्चा सुरू आहे. याबाबत वाराणसी न्यायालयाने आदेश दिला आहे. येथे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास वाराणसी कोर्टाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत.ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे विष्णू शंकर जैन म्हणाले की, “ज्ञानवापी मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात याचिका करण्यात आली होती. या याचिकेतील मागणी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालायने सील केलेले कारंजे सोडून ज्ञानवापी मशीद संकुलाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
स्वातंत्र्यानंतरचे सर्वात भयावह हत्याकांड; मणिपूर दौऱ्यानंतर तृणमूल काँग्रेसची टीका
मणिपूरमधील दोन महिलांचा निर्वस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांचे शिष्टमंडळ मणिपूरला जाऊन एक दिवसाचा पाहणी दौरा करून आले. या दौऱ्यानंतर तेथील परिस्थिती प्रचंड भीतीदायक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. “मणिपूरमध्ये जे काही चालले आहे, ते अतिशय भयानक आणि रानटी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे हे सर्वात भयावह हत्याकांड आहे आणि तेथील भाजपा सरकार उघड्या डोळ्याने शांतपणे हे सर्व पाहत आहे. तेथील परिस्थिती पाहून आम्हाला सर्वांना धक्काच बसला”, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळातील सदस्य, खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी दिली.
देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे १,४१३ कोटींची संपत्ती, तर सर्वात गरीब आमदाराकडे फक्त १,७०० रुपये
देशातील सर्वात श्रीमंत आमदाराकडे तब्बल १,४०० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालमधील एका आमदाराच्या नावावर २,००० रुपयेसुद्धा नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालानुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे १,४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत आमदारांची यादी पाहिली तर लक्षात येईल की, या यादीतले पहिले तिन्ही आमदार कर्नाटकमधील आहेत.एडीआरच्या अहवालानुसार के. एच पुट्टास्वामी गौडा हे देशातले दुसरे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. गौडा हे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्याकडे १,२६७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रिया कृष्णा यांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे १,१५६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सपंत्तीबद्दल प्रश्न विचारल्यावर डी. के. शिवकुमार म्हणाले, मी सर्वात श्रीमंत नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सर्वात श्रीमंत नसलो तरी गरीबही नाही. मी स्वतःला श्रीमंत मानत नाही, कारण माझ्याकडे जी संपत्ती आहे, ती कमवायला मला खूप वेळ लागला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट
मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतो आहे. आता मुंबई , ठाणे, रायगड आणि रत्निगिरीला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी आहे. अशात आता पालघरसाठी आयएमडीने रेड अलर्ट दिला आहे.हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे. धोक्याच्या ठिकाणी जाणं टाळा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान खात्याचा इशारा पाहता खबरदारी घेत मुंबईतील काही ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबई आणि राज्यासह देशभरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरडीमुळे गाव उद्ध्वस्त; इर्शाळवाडीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला प्लॅन
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर काल १९ जुलै रोजी भीषण दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. बचावकार्यात अनेक अडचणी येत असतानाही दुसऱ्यादिवशी बचावकार्य सुरू आहे. रस्ता अरुंद असल्याने तिथे कोणत्याही प्रकारचे वाहन जाऊ शकत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवदेन दिलं आहे. यावेळी त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याची घोषणा आज त्यांनी पुन्हा केली.“धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. राज्यभरामध्ये अशाप्रकारचे जे दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. पावसामध्ये दरड कोसळून दुर्घटना होऊ नये, जीवितहानी होऊ नये याककरता काळजी घेत आहोत. त्याप्रकाराचा निर्णय घेतलेला आहे”, असंही शिंदे म्हणाले.
शिवरायांच्या भूमिकेत झळकणार रितेश देशमुख; जिनिलियानं केलं कन्फर्म
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख हे चित्रपटसृष्टीतील सर्वात क्यूट कपल मानले जाते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. हे दोघे शेवटचे ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसले होते, पण त्याआधी जेनेलियाने लग्नानंतर बरीच वर्षे काम केले नाही. तिने आजवर हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता जिनिलिया लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. जिनिलिया ‘ट्रायल पीरिअड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जिनिलियाने रितेशच्या आगामी चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंडच आला आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. रितेश देशमुखने 2020 मध्ये याबद्द्ल सांगितलं होतं. आता नुकतंच जेनेलिया डिसूझानेही याला दुजोरा दिला आहे.
विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिसचा मोठा विक्रम
त्रिनिदाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ५०० वा सामना आहे. विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ८७ धावा केल्या आहेत. या खेळीसह, कोहलीने जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला. या सामन्यात कोहलीने ९७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ८७ धावांवर नाबाद राहिलेला विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने प्रगती करत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी जॅक कॅलिस पाचव्या स्थानावर होता. आता तो खाली घसरला आहे.
फ्रान्स आणि सिंगापूरनंतर आता श्रीलंकेतही UPI चालणार
जगभरात भारताच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) चा दबदबा हळूहळू वाढत चालला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये यूपीआय पेमेंट सिस्टीम सुरू केल्यानंतर आता भारताच्या शेजारी देश श्रीलंकेतही यूपीआयद्वारे व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या उपस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यात UPI च्या मंजुरीसह अनेक करारांची देवाणघेवाण झाली.आतापर्यंत फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूरने UPI स्वीकारले आहे. UPI ही भारतातील मोबाईल आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे, जी ग्राहकांनी तयार केलेला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरून ग्राहकांना २४ तासांत केव्हाही झटपट पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते.
SD Social Media
9850 60 3590