केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. त्याचवेळी राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. राणे जेवत असतानाच पोलीस घरात घुसले आणि त्यांनी राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे आणि निलेश राणे संतापले. या घटनेचा एक व्हिडीओच व्हायरल झाला आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ 57 सेकंदाचा आहे. त्यात एका खोलीत नारायण राणे खुर्चीवर बसून जेवताना दिसत आहेत. खोलीत एक डॉक्टरही आहेत. सोबत निलेश आणि नितेश राणेही आहेत. तसेच प्रसाद लाड आणि इतर काही कार्यकर्तेही दिसत आहेत. त्याच वेळी काही पोलीस आत शिरले आणि त्यांनी राणेंना अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. चार पोलीस आत शिरल्यानंतर त्यांना निलेश राणे सामोरे गेले. आणि पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
पोलीस राणेंना अटक करण्यासाठी आल्यानंतर ऑर्डर दाखवा. आधी मला ऑर्डर दाखवा. नंतरच सायबांना अटक करा, असं निलेश राणे पोलिसांना जोरजोरात बोलताना दिसत आहेत. तुम्ही साहेबांना हात का लावणार. साहेबांना हात नाय लावायचा. कधीपासून तुमचं हे चाललं आहे. कधीपासून गप्प बसायचं? आधी वॉरंट ऑर्डर दाखवा मगच साहेबांना अटक करा, असं निलेश राणे जोरजोरात बोलताना दिसत आहेत. तेवढ्यात एकजण एक मिनिट एक मिनिट साहेब जेवत आहेत, असं म्हणताना दिसत आहे. निलेश यांच्यापाठी नितेश राणेही तावातावाने बोलताना दिसत आहेत.
व्हिडीओत सुरुवातीला राणे जेवताना दिसत आहेत. त्यांच्या ताटात भात, भाजी आणि भाकरी दिसत आहे. मात्र, नंतर त्यांचं ताट कुणी तरी हिसकावल्याचं या व्हिडीओत दिसतं. मात्र, हे ताट नेमकं कुणी ओढलं ते दिसत नाही. राणेंना जेवू न देताच त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.
या खोलीत असलेले डॉक्टर मात्र निलेश राणेंना सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर पोलीस मात्र, हा सर्व प्रकार शांतपणे ऐकून घेताना दिसत आहेत.