कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा वैज्ञानिकांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे मुलांना सुरक्षित ठेवावं लागेल. त्यासाठी आवश्यक ती तयारी आतापासूनच केली पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. या पूर्वीही त्यांनी पीएम केअर्स फंड आणि पीएम मोदी खोटारडे असून काम करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असेल. अशावेळी पेडियाट्रिक सर्व्हिसेस आणि व्हॅक्सिन ट्रिटमेंट प्रोटोकॉल आधीच तयार करावा लागेल. मोदी सिस्टिमला झोपेतून उठावं लागणार आहे. ही भविष्यातील गरज आहे, असं राहुल म्हणाले.
या आधीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका केली होती. दिल्लीत लागलेल्या एका पोस्टरवरून त्यांनी ही टीका केली होती. विशेष म्हणजे दोघांनीही ट्विटरवर हे पोस्टरच शेअर केलं होतं. त्यात या दोघांनी मलाही अटक करा, असं म्हटलं होतं. तसेच मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली? असं हिंदीत लिहिलेलं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून नेटकरी हे पोस्टर व्हॉट्सअॅपवर डीपी म्हणून ठेवण्यास एकमेकांना सांगत आहेत.
पोलिसांना दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यावर मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन विदेशात का पाठवली? असं लिहिलं होतं. दिल्ली पूर्व, नार्थ ईस्ट, सेंट्रल, नॉर्थ, रोहिणी आणि द्वारका जिल्ह्यात हे पोस्टर लावलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हे पोस्टर कुणी लावले, कुणाच्या इशाऱ्यावरून लावले याचा शोध पोलीस घेत आहेत.