आयकर विभागाने 1 एप्रिल ते 8 डिसेंबर 2020 या कालावधीत 89.29 लाखांहून अधिक करदात्यांना 1,45,619 कोटी रुपयांचा कर परतावा जारी केला आहे. वित्त मंत्रालयाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ज्या करदात्यांनी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल केले आहे, त्यांना आयकर विभाग परतावा देणार आहे. करदात्यांनी आयटीआर दाखल केल्यानंतर आयकर विभाग करांची तपासणी करतो. त्यानंतर परतावा जमा झाल्यास आयटी विभाग करदात्यांना पैसे परत करतो.
परतावा मिळाला आहे की नाही असे तपासा
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (CBDT) करदात्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आपल्याला आयकर परतावा मिळाला की नाही, आपण घरी बसून सहज तपासू शकता. प्राप्तिकर परतावा मिळविण्यासाठी सर्वप्रथम, प्राप्तिकर https://www.incometaxindiaefiling.gov.in/home ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या. नोंदणीकृत वापरकर्त्यांनी लॉगिन करावे. वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा पॅन नंबर, ई-फायलिंग पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल.
वेबसाइटवर आपले प्रोफाइल उघडल्यानंतर, ‘View returns/forms’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून ‘आयकर विवरण’ वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर सबमिट करा. हायपरलिंक अकनॉलेजमेंट क्रमांकावर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल. या स्क्रीनवर आपल्याला फाइल रिटर्न भरण्याची वेळ प्रक्रिया, कर परताव्याची माहिती मिळेल. यात दाखल करण्याच्या तारखेची माहिती, परताव्याची खातरजमा करण्याची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, परतावा देण्याची तारीख आणि देय परतावा याविषयी माहिती असेल. जर आपला कर परतावा अद्याप मिळालेला नसल्यास आपल्याला या स्क्रीनवर दाखल केलेला परतावा अयशस्वी होण्याचे कारण दिले जाईल.