महाविकास आघाडी सरकारच्या रुपानं 3 पक्षांची मोट बांधून राज्यात सत्तास्थापना झाली. महाविकास आघाडी सरकारला आता दीड वर्ष होत आली आहेत. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिली ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याचंही सांगितलं जातंय. याबाबत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजे शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका, असं मत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करु पाहत असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादीची ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचवली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरुन हटवून, त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचं बोललं जातंय. सरकार अंतर्गत सुरु असलेल्या या घडामोडींमुळे मुख्यमंत्री प्रचंड अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांची ही अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली गेलीय. फडणवीस सरकारच्या आधी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरुन सरकारला पायउतार होण्याची वेळ आली होती. त्यामुळे माझ्या सरकारच्या काळात किंवा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग लागू नये, याची खबरदारी मुख्यमंत्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात थोड्या कुरबुरी, नाराजीनाट्य पाहायला मिळालं. पण आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठिणगी पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
मंत्रिमंडळाची चर्चा बाहेर सांगू नये अशी प्रथा आहे. मी याबाबत काही भाष्य करणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ते आवश्यकता असेल तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. कामकाज करत असताना नाराजी धरायची नसते. त्या त्या वेळी तो तो विषय असतो. त्यामुळे कामाबाबत नाराजीची गरज नाही, असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय.