FD मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा होईल मोठे नुकसान

पैसे गुंतवण्याच्या विविध पर्यायांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी हा सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळेच बहुतेक गुंतवणूकदार एफडीमध्ये पैसे गुंतवणं पसंत करतात. यामध्ये सेव्हिंग अकाउंटपेक्षा अधिक चांगला परतावा मिळतो. पण तुम्ही एफडी केल्यानंतर सायबर गुन्हेगारांकडून तुमची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे.

‘ही’ खबरदारी घ्या

सायबर गुन्हेगार लोकांचे पैसे लुटण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधत असतात. लोकांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरण्यासाठी आता हे गुन्हेगार ‘एफडी’ची मदत घेऊ लागलेत. ते बँकेत फिक्स डिपॉझिट केलेल्या ग्राहकाचा मोबाइल क्रमांक मिळवतात आणि त्यांना फोन करून ‘एफडी’साठी काही माहिती अपडेट करण्याचा बहाणा करून ग्राहकांकडून बँकेच्या अकाउंटसंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

एकदा त्यांना बँक अकाउंटची माहिती मिळाल्यावर ते त्यातून अवघ्या काही वेळातच पैसे काढतात. आजकाल, सर्व बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या वेबसाइटवरूनच एफडी करणं, अकाउंट मॅनेज करणं अशा सुविधा देतात. पण यामुळेच सायबर गुन्हेगारांना एफडी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करणं सोपं झालं आहे.

फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग

cnbctv18.com च्या रिपोर्टनुसार, अशी फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बँकेशी संबंधित तुमचे लॉगइन तपशील कोणाशीही शेअर करू नका. तसंच तुमच्या अकाउंटमध्ये वेळोवेळी होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवा. बँकेत अकाउंट उघडताना फॉर्ममध्ये योग्य माहिती भरा. जर तुम्ही चुकीचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी दिला असेल, तर तुम्हाला बँकेने पाठवलेले मेसेज मिळणार नाहीत. तसंच जर तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असेल, तर तुम्हाला मिळणारा ओटीपी दुसऱ्या कोणाला तरी मिळेल, आणि त्या ओटीपीचा संबंधित व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वापर करण्याचीही शक्यता आहे. याशिवाय एफडीमध्ये पैसे जमा करण्यासाठी दिलेला चेक पूर्णपणे भरलेला असावा.

तुमच्या बँकेच्या अकाउंटसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती कोणालाही देऊ नका. एखाद्या व्यक्तीने बँकेचा प्रतिनिधी म्हणून फोन केला, तर प्रथम तो बँकेचा प्रतिनिधी असल्याची खात्री करा. बँक प्रतिनिधी तुमच्या अकाउंट संबंधित संवेदनशील माहिती कधीच विचारत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी बँकेच्या अधिकृत वेबपोर्टलवरूनच एफडी करा. इतर कोणत्याही वेबसाइटवरून एफडी करण्याचं टाळा. एफडी बुकिंगसाठी कोरे चेक देऊ नका. अकाउंट पेयी मध्ये बँकेचं नाव लिहा.

अनेक जण त्यांचे पैसे कोणत्याही जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवण्याऐवजी जोखीममुक्त योजनांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. आजही देशात एक मोठा मध्यमवर्ग आहे, जो बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. पण एफडी केल्यानंतर सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.