बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर पती विराट कोहली हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न केलं होतं. या या दोघांना वामिका नावाची एक गोंडस लेकसुद्धा आहे. या दोघांचे सोशल मीडियावर अफाट फॉलोअर्स आहेत. दोघेही सतत चाहत्यांमध्ये कपल गोल सेट करत असतात. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका नव्या मालमत्तेचे मालक बनल्याची चर्चा आहे. हे सेलिब्रेटी कपल अलिबागमध्ये एक भव्य फार्महाऊस बांधणार असून,त्यासाठी दोघांनी 8 एकर जमीन खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे.
ETimes च्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अलिबागच्या या जमिनीवर फार्महाऊस बांधणार आहेत. त्याचबरोबर या फार्महाऊसची किंमत 19 कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येत आहे. विराट आणि अनुष्का 6 महिन्यांपूर्वी ही जमीन पाहायला गेले होते. परंतु, वेळेअभावी या जमिनीचा व्यवहार रखडला होता. त्यानंतर आता 30 ऑगस्टला या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे. या रिपोर्टनुसार, सेलिब्रेटी कपलने जमिनीचा ड्युटी स्टॅम्पदेखील भरला आहे. मात्र याबाबत अनुष्का किंवा विराटने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाहीय.
सध्या विराट कोहली आशिया कपमुळे दुबईत आहे. त्याच्या अनुपस्थितीत त्याचा लहान भाऊ विकास कोहलीने जमिनीच्या व्यवहाराची जबाबदारी संभाळली आहे. त्याने 1 कोटी 15 लाख रुपये भरुन जमिनीची नोंदणी करुन घेतली आहे. समीरा हॅबिटॅट्स नावाच्या सुप्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून हा करार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
विराटचा भाऊ विकास कोहलीने गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी जमिनीशी संबंधित व्यवहार पूर्ण केला आहे. विराट आणि अनुष्काने खरेदी केलेल्या या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये आहे. ज्यासाठी अनुष्का-विराटने 3 लाख 35 हजार रुपये ड्युटी स्टॅम्पही जमा केला आहे. यापूर्वी क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांनीही याच भागात फार्महाऊस खरेदी केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल देखील या भागात घर बांधण्यासाठी इच्छुक आहेत.त्यामुळे सर्व क्रिकेटर आणि सेलेब्रेटींसाठी अलिबाग हे आकर्षण केंद्र ठरलं आहे.