कोकिळावन हे श्री कृष्णाच्या ब्रजभूमीमध्ये कोशिकलानपासून 10 किमी पश्चिमेस आहे. हा असा परिसर आहे, ज्याबद्दल असे मानले जाते की, येथे शनिदेव कोकिळेच्या रूपात झाडा-झुडपांमध्ये बसले होते आणि त्यांनी गुप्तपणे श्रीकृष्णाची रासलीला पाहिली होती. लहानपणी कृष्ण रात्री गोपिकांसोबत रास करत असे. देवतांनाही ते पाहण्याची मोठी उत्कंठा लागलेली असायची. रास पाहण्यासाठी शनिदेवही आले. त्यांचे रूप उग्र असल्याने त्यांनी कोकिळा पक्ष्याचे रूप धारण केले, जेणेकरून कोणी पाहिले तरी अडचण येणार नाही. मात्र, श्रीकृष्णाने शनिदेवाला बरोबर ओळखले. त्याविषयी अशी आख्यायिका आहे की, तेव्हा शनीने कृष्णाच्या प्रियजनांना त्रास न देण्याचे वचन दिले होते. त्यामुळे शतकानुशतके दर शनिवारी येथे दूरदूरहून मोठ्या संख्येने लोक येतात. जन्माष्टमी असल्याने याविषयी आज आपण जाणून घेऊया.
कोकिळावन कुठे आहे –
शनिदेव येथे येऊन कोकिळा झाल्यामुळे या ठिकाणाला कोकिळावन असे नाव पडले. येथे आता सव्वा कोस परिसरात जंगल पसरले आहे, यात्रेकरूंना त्याची प्रदक्षिणा करावी लागते. इथे गावाचे नावही कोकिळावन आहे. परिक्रमा मार्गावर गवताच्या पेंढ्या बांधून शनिदेवाला प्रसन्न करण्याची परंपरा आहे. कोकिळावन हे राधाच्या बरसाना शहराजवळ येते आणि ते मथुरेपासून 54 किमी अंतरावर आहे.
दर शनिवारी जत्रा भरते –
कोकिळावनात शनिदेवाचे अतिशय प्राचीन सिद्धपीठ आहे. काळ्या रंगाच्या विशाल मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करून दिवे लावले जातात. दर शनिवारी मोठी गर्दी असते. काही दानशूर, श्रीमंत मंडळी हजारो लोकांना पोटभर जेवण देतात.
शनि हा सूर्यपुत्र असल्याने कुंड –
शनि हा सूर्याचा पुत्र आहे. त्यामुळे येथे सूर्यकुंडही आहे. लोकांनी सूर्यकुंडात स्नान केलेच पाहिजे, मंदिराजवळ 2 कुंड बांधले आहेत, ज्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करू शकतात. या कुंडांची खोली खूप जास्त आहे आणि ते कधीही कोरडे होत नाहीत. त्यामध्ये दोरी आणि साखळ्यांच्या साहाय्याने स्नान करण्याची सोय आहे. जलतरणपटू उडी मारून आंघोळ करू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. Sdnewsonline त्याची हमी देत नाही.)