हरिहरेश्वरच्या बीचवर कडक बंदोबस्त तैनात

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहेत. याप्रकरणाची तपासणी आता महाराष्ट्र एटीएस करत आहे. याचबरोबर आज (दि.19) सकाळपासून हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्याने तेथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गस्तीसाठी काही पोलिसांना तेथे तैनात करण्यात आले आहे. काल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तीन एके-४७ रायफल असलेली एक संशयास्पद बोट जप्त केली. यानंतर राज्यातील प्रमुखांनी याबाबत खुलासे केले. हे सर्व प्रकरण महाराष्ट्र ATS कडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी या बोटीची पाहणी केली आहे. तपास अजून सुरू आहे. आम्हाला बोटीतून काही कागदपत्रं मिळाली आहेत. समुद्रातून आम्ही ही बोट बाहेर काढत आहोत, असं एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएस करेल, बोटीतून काही बंदुका आणि राऊंड्स सापडल्या आहेत. बोट आता सुरक्षित असून यामागे दहशतावादाचा संबंध आहे का नाही, हे नंतर स्पष्ट होईल, असं कोकण भागाचे आयजी संजय मोहिते यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस काय म्हणाले?

रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, असं फडणवीस म्हणाले.

या घटनेचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. याचा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

26 जूनला या बोटीचं इंजिन निकामी झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं त्यांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्रातल्या अंतर्गत प्रवाहामुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.