आरोग्य विभागातील 25 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता यासंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागातील भरती परीक्षेच्या तारखाची उद्या घोषणा केली जाणार आहे. त्यासाठी उद्या ११ वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी असणार आहेत. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
तारखांबाबत माझी आणि आरोग्य सचिवांशी बोलणे झाले आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करून त्यानंतर तारखांची निश्चिती करून घोषणा करण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उपस्थित राहणार नाहीत. आजच त्यांनी आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्तांशी चर्चा करून सूचना केल्यात. त्यानुसार उद्या सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
आरोग्य खाते भरती परीक्षा 15, 16 किंवा 22, 23 ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षेची तारीख ठरवण्यासाठी उद्या बैठक घेण्यात येणार आहे. परीक्षा ऐन वेळी शुक्रवारी रात्री उशिरा स्थगित झाल्याने परीक्षा देण्यासाठी अनेकजण आधीच केंद्रांवर पोहोचले होते. त्यासर्व परीक्षार्थींची मोठी गैरसोय झाली होती. विद्यार्थी हितासाठीच परीक्षा पुढं ढकलल्याचा दावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विभागाच्या क गटातील 2739 आणि ड गटातील 3466 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची लेखी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबरला घेण्यात येणार होती. राज्यातील 1500 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार होती. आता या परीक्षांच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात येतील त्या कधी होणार याकडे परीक्षार्थींच्या नजरा लागल्या आहेत.