भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावरील बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा गौरव

केरळमधील कोची येथे शुक्रवारी (2 सप्टेंबर 22) देशातली पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं  अनावरण पंतप्रधान मोदी यांनी केलं. या ध्वजाचं डिझाईन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. भारतात पहिल्यांदा आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या मुद्रेचा हा गौरव आहे. भारतीय नौदलाच्या या ध्वजावरील नवीन बोधचिन्हाशी संबंधित काही नाविन्यपूर्ण तथ्यंदेखील आहेत. `एनडी टीव्ही`ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजावरील बोधचिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत डिझाईन करण्यात आलं आहे. नौदलाच्या जुन्या बोधचिन्हावर लाल सेंट जॉर्जचा क्रॉस होता. हा भूतकाळातल्या ब्रिटिश वसाहतवादाशी जोडलेला होता. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याने आता ब्रिटिश वसाहतवादाच्या  देशातील आणि आपल्या मनांतील गुलामीच्या खुणा पुसून टाकण्याचं आवाहन पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 22 च्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केलं होतं. त्याला अनुसरूनच नौदलाच्या ध्वजावरील चिन्हात बदल करण्यात आला आहे.

‘आज 2 सप्टेंबर 2022 रोजी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे ओझं झुगारलं आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदल ध्वजावर गुलामगिरी दर्शवणारं रेड सेंट जॉर्जच्या क्रॉसचं चिन्हं होतं. नवं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. आता नौदलाचा नवा ध्वज समुद्र आणि आकाशात दिमाखात फडकेल’, असं या वेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले.

ही आहेत वैशिष्ट्यं

नौदलाच्या नव्या ध्वजावरील बोधचिन्हाची खास अशी वैशिष्ट्य आहेत. बोधचिन्हाची खास वैशिष्टय सांगणारा एक व्हिडिओ नौदलानं शेअर केला आहे.

‘या ध्वजाच्या वरच्या कॅन्टोनवर म्हणजे कोपऱ्यात राष्ट्रध्वज आहे. शेजारी असलेलं बोधचिन्हात निळा अष्टकोनी आकार असून, त्यात एका अँकरच्यावर राष्ट्रीय चिन्ह आहे. या दोन चिन्हांना सामावून घेणारा ढालीचा आकार भारतीय नौदलाच्या ‘शं नो वरुण:’ या बोधवाक्याच्या पायावर उभा आहे. अष्टकोनी आकाराला आतल्या बाजूने दोन सोनेरी किनारी आहेत. अष्टकोनी आकार भारतीय नौदलाची अष्टदिशात्मक पोहोच आणि बहुआयामी ऑपरेशनल क्षमतेचं प्रतीक असलेल्या आठ दिशांचं प्रतिनिधित्व करतो. हा अष्टकोनी आकार शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेतून घेण्यात आला आहे. यावरील नांगराचं अर्थात अँकरचे  चिन्ह स्थिरता दर्शवतं,’ असं नौदलानं सांगितलं.

‘सतराव्या शतकात परकीयांच्या आक्रमणांपासून किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं होतं. हे भारतातलं पहिलं आरमार होतं. या आरमारात 60 लढाऊ जहाजं आणि अंदाजे 5000 मावळ्यांचा समावेश होता. दूरदृष्टीने देशाचं संरक्षण करणाऱ्या महान राजाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या राजमुद्रेचा अष्टकोनी आकार नव्या ध्वजावरील नौदलाच्या बोधचिन्हाला देण्यात आला आहे,’ असं नौदलानं नवीन बोधचिन्हासंदर्भातील व्हिडिओत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.