एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. आता नवी मुंबईत शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
आता आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. नंदनवन येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला गेला. यापूर्वी 28 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. ऐरोली पाठोपाठ आता बेलापूर मतदारसंघालाही खिंडार पडलं आहे. रामदास पवळे, रंगनाथ औटी, काशिनाथ पवार , रामचंद्र पाटील, ज्ञानेश्वर सुतार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
दरम्यान गुरुवारीच शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका आहे. गोपाळ लांडगे यांचं कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलं प्रभुत्व आहे. त्यांनी शिंदे सेनेला साथ दिल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे.