राज्यातील नवं शिंदे सरकार स्थापन होवून बरेच दिवस झाले तरी देखील राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सुरुवातीला आषाढी एकादशी आधी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा आहे. या सर्व चर्चांदरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाणार आहेत. फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्ताराआधी भेट होत आहे. त्यामुळे या भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस आज सकाळी अकरा वाजता ‘शिवतीर्था’वर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वीच भेट होणार होती. पण पावसामुळे ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील आगामी घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या मंत्रिमंडळात मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण ती चर्चा खोटी असल्याचं नंतर उघड झालं. या सगळ्या घडामोडींदरम्यान फडणवीस-राज ठाकरे भेटीचं नेमकं गुपीत काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचं देखील मानलं जात आहे. पण या भेटीत राजकीय कारण असल्याची देखील चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्यावेळी राज यांनी फडणवीसांचं कौतुक केलं होतं. याशिवाय राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी फडणवीसांनी सपत्नीक भेट दिली होती. त्यामुळे ठाकरे-फडणवीस यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसात वाढल्याचं चित्र आहे.