राज्यात ड्रग्ज, जुगार अशा अवैध गोष्टींना प्रतिबंध आहे. काही लोकांना जुगार खेळणं तर प्रतिष्ठेचं वाटतं. जुगार म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर पैसे लावून पत्ते खेळणारे पुरुष येतात. पण उल्हासनगरात पोलिसांनी चक्क एका महिलांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केलाय. जुगारी महिलांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा लाईव्ह व्हिडीओदेखील समोर आलाय. विशेष म्हणजे या महिला मनोरंजन म्हणून नव्हे तर हजारो रुपयांचा जुगाराचा खेळ खेळत होत्या. जुगार खेळणाऱ्या या महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 22 मध्ये एका घरात महिलांचा जुगाराचा अड्डा भरत असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलिसांना सोबत घेत या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सात महिला पैसे लावून जुगार खेळत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यांच्याकडून 47 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या महिलांवर जुगार प्रतिबंधक अधिनियम आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे या सगळ्या महिला चांगल्या घरातल्या आहेत. जुगाराचा अड्डा भरवणारी महिला ही त्यांच्याकडून एका वेळचे 1 हजार रुपये घेत असल्याचं सुद्धा पोलीस तपासात समोर आलंय. त्यामुळं पुरुषांसारखेच महिलासुद्धा जुगारी बनल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतंय.
दरम्यान, उल्हासनगरात गुन्हेगारी घटनांत वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी अपहरण प्रकरणात एकाला अटक करण्यात आलं होतं. उल्हासनगरातून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली होती. येथील पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव याला या प्रकारणात अटक केलं होतं. हा आरोपी मुलीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून फरार होता. मात्र त्याला गुजारतमधून अटक करण्यात आले. दोन महिन्यांपासून कोणताही थांगपत्ता न लागू देणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला त्याच्या फक्त एका चुकीनंतर बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या मुलीची सुखरुपपणे सुटका करण्यात आली असून ‘अंडापाव’ या सराईत गुन्हेगाराची पोलीस चौकशी केली जात आहे.