प्रवास करताना एकट्या व्यक्तीने कारमध्ये मास्क लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. दिल्ली सरकारने कारमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर उच्च न्यायालयाने याचिका कर्त्याला फटकारत मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
खासगी वाहनातून एकट्याने प्रवास करणाऱ्यानाहि दिल्ली सरकारने मास्क वापरणं सक्तीचे केलं आहे. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिल्ली सरकारने काढलेले असून, याविरोधात चार याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या होत्या. या याचिकांवर न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिककर्त्यांची कानउघाडणी केली.
“एक व्यक्ती जरी खासगी वाहनातून प्रवास करत असेल, तरीही त्या व्यक्तीने मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाहनात एक व्यक्ती असो की अनेक मात्र, मास्क लावणं सक्तीचंच आहे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. वैज्ञानिक, संशोधक, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारकडून करोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क वापरण्यावर जोर दिला जात आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
“काही लसी उपलब्ध झाल्या असल्या, तरी करोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मास्क वापरण्यावर जोर दिला जात आहे. व्यक्तीचं लसीकरण झालेलं असो वा नसो, मात्र मास्क वापरणं आवश्यकच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क हे सुरक्षा कवचासारखंच आहे,” असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.