तमिळनाडूत ६३ टक्के, केरळमध्ये ७४ टक्के मतदान

केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये मंगळवारी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून उत्स्फूर्तपणे मतदान केले. तमिळनाडूमध्ये ६३.४७ टक्के तर पुडुचेरीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७७.९० टक्के इतके मतदान झाले आणि केरळमध्ये जवळपास ७४ टक्के मतदान झाले. आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात जवळपास ७९ टक्के इतके मतदान झाले.पश्चिम बंगालमध्ये दोन महिलांसह पाच उमेदवारांवर हल्ले करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तेथे तिसऱ्या टप्प्यातील ३१ जागांसाठी ७७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांचा ताबा घेतला, ते तृणमूल कार्यकर्त्यांवर, उमेदवारांवर हल्ले करीत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी येथे केला. त्या म्हणाल्या की, आरामबाग मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या उमेदवार सुजाता मोंडल यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला आणि मतदान केंद्राजवळ त्यांच्या डोक्याला दुखापत केली. त्यामुळे सुजाता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे खानकूल येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणखी एका उमेदवाराला मारहाण केली, असेही त्या म्हणाल्या.

कॅनिंग पूर्व येथे सुरक्षा दलांनी आमच्या पक्षाचे उमेदवार शौकत मुल्ला यांना मतदान केंद्रात प्रवेश करण्यास मज्जाव केला, आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्याकडे हल्ल्याबाबतच्या किमान १०० तक्रारी आल्याचे त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगाला त्याबाबत माहिती देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या सभांना गर्दी कमी होत असल्याने दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाने कारस्थान रचले आहे, मतदान केंद्र बळकावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला प्रतिबंध करू नका, अशा सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या असल्याचेही ममता म्हणाल्या. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आमच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे, तरीही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. असे असले तरी तुम्ही आम्हाला भीती दाखवू शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.