ब्राझीलच्या राजधानीत ८ जानेवारी रोजी पराभूत अध्यक्ष जईर बोल्सोनारो यांचे समर्थक असलेल्या अतिउजव्या विचारसरणीच्या निदर्शकांनी दंगल केली होती. या दंगलप्रकरणी ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्व्हा यांनी लष्करप्रमुखांना हटवले. त्यांनी काही दिवसांपूर्वी उघडपणे सांगितले होते, की या दंगलीस लष्कराच्या काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा होता.
ब्राझीलच्या लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाने शनिवारी लष्करप्रमुख ज्युलिओ सीझर डी अरुडा यांना लष्करप्रमुखपदावरून हटवल्याचे जाहीर केले. त्यांच्या जागी जनरल टॉमस मिगुएल रिबेरो पायवा यांची नियुक्ती झाली. ते ब्राझीलच्या आग्नेय लष्करी मुख्यालयाचे प्रमुख होते.
या दंगल व हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत सार्वजनिक भाष्य न करणाऱ्या अध्यक्ष लुलां यांनी संरक्षण मंत्री जोस मुसिओ, संरक्षण दल प्रमुख रुई कोस्टा यांच्यासह नव्या लष्करप्रमुखांसह राजधानी ब्राझिलियात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संरक्षण मंत्री मुसिओ म्हणाले, की ८ जानेवारीच्या दंगलीमुळे सैन्याच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांवरली विश्वासास तडा गेला. त्यामुळे बदल आवश्यक असल्याचे सरकारला वाटले.
काही दिवसांपूर्वी माजी अध्यक्ष जईर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी बोल्सोनारो यांचे अध्यक्षपद कायम राखण्यासाठी सरकारी इमारतींवर हल्ला करून, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली होती. या दंगल व हिंसाचारानंतर अध्यक्ष लुला यांनी लष्करावर टीका केली होती. या दंगलीमुळे ब्राझीलमधील डावे आणि उजवे यांच्यातील ध्रुवीकरण स्पष्ट झाले आहे.