सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कौतुक केले.
‘‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यांनी यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचीही सूचना केली आहे. अनेक लोकांना विशेषत: तरुणांना मदत करणारा हा प्रशंसनीय विचार आहे.’’, असे मोदी यांनी नमूद करत चंद्रचूड यांच्या मुंबईतील कार्यक्रमाची चित्रफित ट्वीट केली.
‘‘भारतात विविध भाषा आहेत. याद्वारे आपल्या संस्कृतीच्या चैतन्याबरोबर जोडता येते. केंद्र सरकार भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. यामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय सारख्या विषयांचे मातृभाषेत शिक्षण देण्याचा पर्यायाचा समावेश आहे,’’ असे मोदी यांनी अन्य एका ट्वीटमध्ये नमूद केले. न्यायालयीन निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून सामान्यांना दिलासा देण्याचा पंतप्रधानांनी यापूर्वी वेळा आग्रह धरला आहे.