हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊ या. यावर्षी गुढीपाडवा 2 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत प्रतिपदा तिथी असेल.
पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीराम या दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. असं मानलं जातं, की घरामध्ये गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सुख-समृद्धी येते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व जण आपल्या घराची विशेष साफसफाई करतात आणि सजावट करून घरातलं वातावरण प्रसन्न आणि शुद्ध बनवतात. गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरुवात होते.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाऊन दिवसाची सुरुवात केली जाते. असं म्हटलं जातं, की यामुळे रक्त शुद्ध होतं आणि शरीर मजबूत होतं. गुढीपाडव्याला आंब्याच्या पानांचं तोरण घराच्या दारावर लावलं जातं. त्यानंतर घराबाहेर सुंदर गुढी उभारली जाते. गुढीसमोर आणि दारासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. गुढीची मनोभावे पूजा करून सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
गुढीपाडव्यानिमित्त घरात पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, मसालेभात, आमरस, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटण्या, गुलाबजाम, कोथिंबीरवाडी अशा वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. या दिवशी घरातली सर्व मंडळी आवर्जून एकत्र जेवणाचा आस्वाद घेतात. या दिवशी घरात धनधान्य आणलं जातं. नवीन पिकाची पूजा केली जाते. तसंच सोनं, वाहन किंवा घर यांची खरेदी केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतंही काम सुरू करणं शुभ मानलं जातं.
विक्रम संवत हिंदू पंचांगानुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली अशीदेखील एक धार्मिक मान्यता आहे. याच दिवसापासून सत्ययुगाला सुरुवात झाली असं मानलं जातं. गुढीपाडव्याचा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये उगादी, युगादी, चेटी चंड इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि साजरा केला जातो. मणिपूरमध्येही हा दिवस साजरा केला जातो.