त्रिपुरामध्ये मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी राज्याच्या राजकारणात मोठा बदल होताना दिसत आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिलाय. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे केंद्रीय निरीक्षक म्हणून त्रिपुरात आहेत. बिप्लब कुमार देब यांच्या जागी नव्या नेत्याची घोषणा आज संध्याकाळी केली जाणार आहे.
त्रिपुरात पोहोचलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे केंद्रीय निरीक्षक भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, रात्री आठ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यामध्ये नवा नेता निवडला जाईल. बिप्लब कुमार देब यांनी 2018 मध्ये त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ज्यामुळे त्रिपुरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 25 वर्षांच्या राजवटीचा अंत झाला.
नव्या चेहऱ्यासह भाजपला विधानसभा निवडणुकीत उतरायचे असून, बिप्लब देव संघटनात्मक कामात व्यस्त राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देब यांच्या जागी नवीन नेत्याचा निर्णय संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यात भाजप आमदार सुदीप राय बर्मन आणि आशिष साहा यांनी त्रिपुरा विधानसभेचा राजीनामा दिला आणि पक्षाचे सदस्यत्वही सोडले. त्यानंतर त्यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यावर आरोप केले. त्यानंतर दोन्ही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी आरोग्य मंत्री सुदीप राय बर्मन म्हणाले होते की, ‘राजीनामा दिल्यानंतर मला दिलासा मिळाला आहे कारण मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. त्रिपुरामध्ये लोकशाहीचा गळा घोटला गेला असून कोणालाही बोलू दिले जात नाही.’
ते म्हणाले होते की, ‘त्रिपुरामध्ये एक मुखिया आणि काही अधिकारी निरंकुश सरकार चालवत आहेत, जिथे लोकांचा आवाज ऐकणारे कोणी नाही. मंत्र्यांना स्वतंत्रपणे कर्तव्य बजावण्याची परवानगी नाही. लोकशाही हायजॅक करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. राय बर्मन यांनी दावा केला होता की पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात येईल कारण अनेक आमदार हताश होऊन पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत.’