इजिप्तचं नाव घेतलं तर समोर उभे राहतात पिरॅमिड आणि नजर जाईल तोवर वाळवंट. पण याच इजिप्तची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे विंचू. इजिप्शिन संस्कृतीवर बनवलेला कुठलाही हॉलीवूडचा चित्रपट पाहा, दर ममी असो की स्कॉर्पियन किंग. त्यात विंचवाने नांगी आपटली नाही असं होत नाही. कुठं ना कुठं आणि कधी ना कधी त्याचा संदर्भ येतोच, एवढंच काय तर पिरॅमिडच्या आत काढलेल्या भित्तीचित्रांवर आणि हजारो वर्ष जुन्या दस्तऐवजातही विंचू दिसला नाही असं होत नाही. आणि आता याच विंचूची दहशत इजिप्तमध्ये पुन्हा पसरल्याच्या बातम्या येत आहेत.
आतापर्यंत इजिप्तमध्ये 500 हून अधिक लोकांना विंचवाने दंश मारला आहे, ज्यातील 3 लोकांचा मृत्यूसुद्धा झाल्याची बातमी समोर आली होती. वादळ, वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वाळूखाली, दगडाखाली लपलेली विंचू बाहेर पडताहेत, आणि हाच मोठा त्रास आता इजिप्तमधील लोकांना सहन करावा लागत आहे.
सर्वाधिक भयानक परिस्थिती आहे अस्वान शहराची. जिथं विंचवांचं बाहेर पडण्याचं आणि लोकांना दंश करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. इथलं सरकारी वृत्तपत्र असलेल्या अल-अहरामने शनिवारी विंचू चावल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध केली. ज्यात त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा हवाला दिला. मात्र काही वेळातच आसवानचे गव्हर्नर मेजर जनरल अशरफ अतिया म्हणाले की, तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी चुकीची आहे. मात्र, विंचू चावल्याने पाचशेहून अधिक लोक आजारी पडल्याचे त्यांनी मान्य केले.
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी, अस्वान आणि आसपासच्या भागात जोरदार वादळ आलं. हे क्षेत्र तांबड्या समुद्राच्या पर्वतरांगांना लागून आहेत. म्हणजे काही भाग कोरडा तर काही हिरवा तर काही वाळवंट. पाऊस आणि पुरामुळे जमिनीखाली पाणी शिरलं आणि विंचू बाहेर आले. अस्वान शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झालं आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. मातीच्या विटांनी बांधलेली घरे कोसळली आहेत. टीव्ही, इंटरनेट आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.