साखर सम्राट म्हटलं की बदनामीचा शिक्का लावला जातो. तसाच शिक्का शिक्षण सम्राट म्हटलं की लावला जातो. ते योग्य नाही. कारण काहीच शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार घडतात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकमधील गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या अधिवेशनात मोफत शिक्षण कायद्याची तरतूद खासगी शिक्षण संस्थांना लागू करा, अशी मागणी करण्यात आली.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र हा शिक्षणात प्रगत असून त्याचे श्रेय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. महिलांनाही शिक्षण दिले. याशिवाय स्व. कर्मवीर भाऊराव पाटील, स्व. वसंतदादा पाटील तसेच रयतच्या माध्यमातून खासदार शरदचंद्र पवार यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्व. वसंतदादा पाटील यांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. त्यातून महाराष्ट्रात शिक्षण संस्थाचा विकास होऊन परराज्यातून विद्यार्थी आज शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्रात येत आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भुजबळ म्हणाले की, काही शिक्षण संस्थामध्ये गैरप्रकार होत असले, तरी सगळ्याच शिक्षण संस्था या वाईट आहेत असे नाही. अनेक शैक्षणिक संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. साखर सम्राट म्हटलं तर बदनामीचा शिक्का लावला जातो, तसाच शिक्का शिक्षण सम्राट म्हटलं की लावला जातो. हे योग्य नाही. कोरोना काळात शैक्षणिक संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता अर्थचक्र सुरू झाले असून महाविकास आघाडी सरकार योग्य ते सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा यासोबत शिक्षण क्षेत्राला सावरण्याची आवश्यकता आहे. शासनाने यासाठी आवश्यक मदत करावी. मोफत शिक्षण कायद्याच्या तरतुदीत खासगी शिक्षण संस्थांना तरतूद नसल्याने संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे. मोफत हक्क शिक्षण कायद्याअंतर्गत खासगी शिक्षण संस्थांचा समावेश करण्यात यावा. तसेच शिक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी यासह विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अॅड. किरण सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.