मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवल्यानंतर, त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. उत्तर प्रदेशातही मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाबाबत चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी आदेश दिला आणि प्रार्थना स्थळांवरील 17 हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे. तसेच 125 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाजाच्या मुद्यावर न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था विभागाचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जात असून, 125 ठिकाणच्या धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. तर 17 हजार ठिकाणच्या प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि लाऊडस्पीकरचे आवाज स्वतःहून कमी केले आहे. शांती समितीच्या बैठकीनंतर प्रार्थना स्थळांनी स्वतःहून निर्णय घेतले आहेत.
राज्यात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक मिरवणूका, जुलूस काढण्याआधी परवानगी गरज असणार आहे. धार्मिक कार्यक्रम आणि प्रार्थनेवेळी इतरांना त्रास होणार नाही. याची काळजी घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.