शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं, असं सांगून प्रताप सरनाईक यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सरनाईक हे आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
सभागृहात जाण्यापूर्वी सरनाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देतानाच आघाडी सरकारविरोधातील त्यांच्या मनातील खदखदही बोलून दाखवली. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं. त्यामुळे मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं सरनाईक यांनी सांगितलं.
माझ्या पक्षाच्या प्रतोदाने व्हीप बजावला. त्यामुळे अधिवेशनाला आलो आहे. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं सांगतानाच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असं सरनाईक म्हणाले.
गेल्या अधिवेशनात किरीट सोमय्या यांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या यांच्या कुटुंबीयांनी मीराभायंदरमध्ये बेकायदेशीपरणे अनधिकृत बांधकामे केल्याचं प्रकरण मी उघड केलं होतं. त्यामुळे सोमय्यांनी माझ्याविरोधात आंदोलन केलं होतं, असा दावा त्यांनी केला.
माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. पत्नीला कर्करोग आहे. कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मी थोडे दिवस मीडियापासून लांब होतो. पण माझ्या मतदारसंघात काम सुरू होतं, असं ते म्हणाले.
भाजप-सेनेची युती तुटायची वेळ होती. त्यावेळी मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर मीडियांने मला काही प्रश्न केले. तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी मी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला मांडला होता. मी अन्वय नाईक प्रकरण उकरून काढलं. विधीमंडळात आवाज उठवला. त्यानंतर कंगना रनौतने मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले म्हणून तिच्याविरोधात हक्कभंग दाखल केला. त्यामुळे मी विरोधकांसाठी टार्गेट होतो. माझ्या विरोधात कोणताही गुन्हा नसताना, कोणताही आरोप नसताना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल नसताना मला टार्गेट करण्यात आलं. माझ्यामागे ईडी लावण्यात आली. त्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयाने मला संरक्षण दिलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.