एलन मस्क यांच्या अमेरिकन एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने जगातील पहिल्या सिव्हिलियन नागरिकांच्या क्रूसह बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अंतराळात इंस्पायरेशन 4 मिशन प्रक्षेपित करुन इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय वेळेनुसार पहाटे 5:32 वाजता 4 सर्वसामान्य लोकांना अवकाशात पाठवले आहे. हे 4 पर्यटक 3 दिवस पृथ्वीच्या कक्षेत 575 किमी वर राहतील.
हे प्रवासी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 357 मैल (575 किमी) उंचीवर प्रवास करत आहेत. फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. ही घटना जगभरातील अंतराळ प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी कुतूहलाचे कारण बनली आहे. हे मिशन केवळ सरकार पुरस्कृत अंतराळवीरांपेक्षा सामान्य लोकांसाठी मानवी अंतराळ उड्डाणाच्या नवीन युगाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. 2009 मध्ये शास्त्रज्ञांनी 541 किमी उंचीवर टेलिस्कोप रिपेयरिंग केलं होतं.
2009 नंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य माणूस इतक्या उंचीवर आहे. स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल लिफ्टऑफच्या 12 मिनिटांनंतर फाल्कन 9 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यापासून विभक्त झाले, त्यानंतर नागरी क्रू यशस्वीरित्या कक्षेत सोडण्यात आली आहे, असं एरोस्पेस कंपनीने कळवलं. मिशनला 38 वर्षीय अब्जाधीश आणि परोपकारी जेरेड इसाकमन यांनी निधी दिला आहे. जे शिफ्ट 4 पेमेंट्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते स्पेसफ्लाइटचे मिशन कमांडर देखील आहेत, ज्यांनी स्पर्धेद्वारे उर्वरित क्रूची वैयक्तिकरित्या निवड केली.
या मिशनचा उद्देश अमेरिकेतील सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे आहे. मिशनचे नेतृत्व करणाऱ्या इसकमनच्याद्वारे $ 200 दशलक्ष जमा करायचे आहेत, त्यातील अर्धा ते स्वतः देतील. मिशनच्या निधीतून कर्करोगाविरुद्ध जनजागृती मोहीमही चालवली जाईल. मिशनचा एक सदस्य कर्करोगापासून वाचलेला देखील आहे. पृथ्वीच्या कक्षेत जाणारी ही बिगर व्यावसायिक अंतराळवीरांची पहिली टीम आहे.