“आपल्या हातात एकाच वेळेस 500 रुपये…आणि आपल्या मना प्रमाणे हवे ते खरेदी करायला मिळावे” असे अशक्य वाटणारे कष्टकऱ्यांच्या मुलांचे स्वप्न रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या “सपने सच हुए” या उपक्रमामुळे साकार झाले.
रविवार दि.31 जुलै रोजी सकाळी 9 वाजता डी मार्ट येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रोटरी जळगाव सेंट्रलच्या सदस्यांकडे कामाला असलेले कर्मचारी, धुणी-भांडी करणाऱ्या महिला यांच्या मुलांना देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 500 रुपये देऊन खरेदीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. या मुलांनी खाऊच्या वस्तू, खेळणे, शैक्षणिक साहित्य आत्मविश्वासाने स्वतः खरेदी केले.
या मुलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष विपुल पारेख, मानद सचिव रविंद्र वाणी, प्रकल्प प्रमुख कल्पेश दोशी, महेंद्र रायसोनी, डॉ. अंजुम अमरेलीवाला, संजय तोतला, संतोष अग्रवाल, शामकांत वाणी, डॉ. अपर्णा भट-कासार, महेंद्र गांधी,डाॕ.अनंत पाटील, विलास देशमुख, सहसचिव दिनेश थोरात, डॉ. विलास महाजन, शामलाल कुकरेजा, ललीत मल्हारा, हरिष ठक्कर, सारिका शाह यांनी आर्थिक योगदान देत यावेळी विशेष उपस्थिती दिली. डी.मार्टचे व्यवस्थापक आनंद ठाकूर व तुषार यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे मुलांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद ओसडूंन वाहता होता. तर रोटरी सेंट्रलच्या सदस्यांच्या मनात कृतार्थतेची भावना उमटत होती. कर्मचारी पालकांनी रोटरी सेंट्रलचे आभार व्यक्त केले.