आज दि.३१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मी अखेरपर्यंत.. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांना 9 तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली होती. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना याआधी दोनवेळा समन्स बजावले होते.

जेरेमी लालरिनुंगाची ‘वजनदार’ कामगिरी; अवघ्या 19व्या वर्षी सुवर्ण पदक मिळवत विक्रम

भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 19 वर्षीय वेटलिफ्टरने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. लालरिनुंगाचा 300 किलो (140+160 किलो) वजन उचलण्याचा प्रयत्न राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळवण्यात यशस्वी ठरला. जेरेमीने चार वर्षांत तिसऱ्यांदा तिरंग्याची शान उंचावली आहे. 2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाशिवाय त्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. आता त्याच्याकडून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताच्या खात्यात 5 वं पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. जेरेमी लालरिनुंगापूर्वी, 30 जुलै (शनिवार) रोजी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने 61 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.

शेतकऱ्यांसाठी खास क्रेडिट कार्ड, कमी व्याजात मिळेल कर्ज, इतरही अनेक फायदे

किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारद्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी चालवली जाणारी योजना आहे. या क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी शेतीच्या कामासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी अत्यंत स्वस्त दरात कर्ज घेऊ शकतात. याद्वारे शेतकऱ्यांना हमीभावाशिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज दिलं जात आहे. त्याचबरोबर 3 वर्षात शेतकरी याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. कर्ज वेळेवर संपुष्टात आणल्यास, या क्रेडिट कार्डद्वारे व्याज देखील फक्त 4 टक्के असेल. हे मिळवणं खूपचं सोपं आहे. यासाठी तुमचं पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खातं असणं आवश्यक आहे.

ठाण्यात शिवसेना पुन्हा दिघेंच्याच नेतृत्वात, उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी, आनंद दिघेंच्या पुतण्याला मोठी जबाबदारी

आपल्या आनंदाच्या क्षणात आणि भरभराटीच्या क्षणात सर्वच सोबत असतात. पण कठीण प्रसंगात जे सोबत असतात तेच खरी आपली माणसं असतात. कठीण प्रसंगातच अशा माणसांची आपल्याला जाणीव होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही तसंच काहीसं घडत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेवर मोठं संकट उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर रोखठोकपणे मांडणारे संजय राऊत यांच्यापाठीमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने त्यांना पत्राचाळ घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी ताब्यातही घेतलं आहे. या कठीण काळात उद्धव ठाकरेंनी संयम सोडलेला नाही. आपले जवळच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडल्यानंतरही ते लढण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्याईमुळेच ठाण्यात शिवसेनेचा पाया भक्कम झाला. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे कामे झाली. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आनंद दिघे यांच्यासोबत रक्ताचं नातं असलेले केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांची ही आताची खूप विचारपूर्वक आणि महत्त्वाची राजकीय खेळी मानली जात आहे.

इंदिरा गांधींपेक्षाही भयानक आणीबाणी, मोदीजी हे खूप झालं.. खैरेंचा थेट PM ना इशारा

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी यांनी एकवेळ आणीबाणी लावली होती. त्याहीपेक्षा हे भयंकर आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आता बस्स झालं, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असून शिवसेना संपणार नाही. भाजपचे नेतेच या कारवाईच्या विरोधात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे. हे सूडाचं राजकारण आहे. संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहे. ते घाबरणार नाही.

‘एकनाथ खडसे लवकरच जेलमधील जातील’, गिरीश महाजनांचा दावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली.महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर ईडीची पिडा कायम आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.

शाळेला सुट्टी असल्याने खेळायला गेले, एकाच कुटुंबातील 5 मुलांसोबत घडली दुर्दैवी घटना

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात रविवारी झालेल्या एका वेदनादायक आणि मोठ्या अपघातात एकाच गावातील पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. अपघातात बळी पडलेली दोन्ही मुले सख्खे भाऊ होते. अपघातानंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. घरच्यांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हादरून गेले. पोलिसांनी डिग्गीतून मृतदेह काढून रामसिंगपूर रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. घटनास्थळी व रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. पण, कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नाहीय.

राष्ट्रकूल स्पर्धेत सांगलीच्या स्मृतीची तुफान फटकेबाजी, भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय

राष्ट्रकूल स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधनाच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. स्मृतीने 47 धावांवर असताना षटकार लगावत अर्धशतक ठोकले. भारताने 2 गडी गमावले तेव्हा फक्त 6 धावा लागत होत्या आणि 44 चेंडू शिल्लक होते. स्मृती मंधानाच्या फटकेबाजीने भारताचा विजय सहज बनवला. तिने 42 चेंडूत 63 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 8 चौकांराचा समावेश आहे. याप्रकारे भारताने 8 गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ; १४ वर्षीय अनाहतने राष्ट्रकुल स्पर्धेत रचला इतिहास

इंग्लंडमधील बर्मिंगहममध्ये सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची धूम सुरू आहे. भारताच्या मीराबाई चानू, संकेत सरगन यांनी पदक मिळवून भारताची कामगिरी उंचावली आहे. पीव्ही सिंधू, बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांसारख्या बड्या भारतीय खेळाडूंवर आता सर्वांची नजर आहे. पण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १४ वर्षीय स्क्वॉशपटू अनाहत सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनाहत ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू ठरली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.