सामनामधून संजय राऊतांचा ‘रोखठोक’ निशाणा ; “मोदी-शाह यांना आता बदलावं लागेल”

“पश्चिम बंगालच्या जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार आणि बदनामी ही शस्त्र आता जुनाट आणि बोथट झाली. याच न्यायाने उद्या श्री मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना स्वत:ला बदलावे लागेल!” असं राऊत म्हणाले आहेत.

पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा वास्तविक अनेक पटींनी वाढल्या असंच म्हणता येईल. मात्र, तरीदेखील त्यांनी खुद्द पंतप्रधानांपासून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जी काही फौज उभी केली होती, ती पाहाता ही जागाची वाढ अपुरीच म्हणावी लागेल. त्यामुळे हा मोदींचा नैतिक पराभव आहे, अशी टीका राजकीय विश्लेषक करू लागले असताना सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाच्या धोरणांचा समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांनी लेखात ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकरांशी केली आहे. “ही विधवा बाई काय राज्य करणार? असं म्हणणाऱ्या दरबारी मंडळींचा प्रमुख गंगोबा तात्या यानं राघोबा दादांशी संधान बांधलं. राघोबा दादा इंदूरवर चालून गेले. अहिल्याबाईंचा आपल्यासमोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ असा त्यांना विश्वास होता. अहिल्याबाईंनी राघोबादादांना निरोप पाठवला की तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हरलात तर काय होईल. मी बाईमाणूस असल्याने मला कुणी हसणार नाही. पण तुमचा पराभव झाला तर जगास तोंड दाखवायला जागा राहणार नाही. राघोबा दादांना हा निरोप मिळताच त्यांनी मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. पश्चिम बंगालमध्ये याहून वेगळं काय घडलं?” असं संजय राऊत म्हणतात.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मांडलेल्या मुद्द्यांचं रॉकेट उडालं असं संजय राऊत म्हणतात. “पश्चिम बंगालात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर रोजी-रोटीसाठी आले आहेत. जय श्रीरामच्या गर्जनेचं त्यांना आकर्षण वाटलं. ममता बॅनर्जींनी या हिंदी भाषिक मतांकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिकांना भावनिक साद घातली. बाहेरचे लोक येऊन बंगाल बिघडवत आहेत हा त्यांचा प्रचाराचा पहिला मुद्दा. बंगालचा आम्ही गुजरात होऊ देणार नाही, हा दुसरा मुद्दा. या मुद्द्यांचे रॉकेट उडाले आणि त्यात भाजपाची लंका जळाली”, असं राऊत यांनी या सदरात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.