महानायक अमिताभ बच्चन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे ई-पाससाठी अर्ज आल्याचं समोर आलं आहे!
करोनाच्या काळात देशभरात अनेक राज्यांनी निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी कडक लॉकडाउन तर काही ठिकाणी संचारबंदी, जमावबंदी, प्रवासबंदी असे निर्बंध घालण्यात आले आहेत. काही राज्यांमध्ये अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास ई-पासची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण ई-पासच्या प्रणालीमध्ये कधीकधी अशी प्रकरणं समोर येतात, की प्रशासन देखील चक्रावून जाते. तसेच, अशा प्रकरणांमुळे या व्यवस्थेमधले दोष देखील उघडे पडतात. हिमाचल प्रदेशमध्ये अशीच अधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारी प्रकरणं समोर आली आणि थेट पोलिसांना तक्रार दाखल करावी लागली! नेमकं झालं काय?
हिमाचल प्रदेशमध्ये निर्बंध!
करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारने काही निर्बंध घातले आहेत. यामध्ये अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अशा प्रवासांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावरून ई-पास घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सुरुवातीच्या देशव्यापी लॉकडाउनमध्ये अशा अर्जांना जिल्हाधिकारी किंवा प्रमुख अधिकारी तपासणीनंतर मंजुरी देत असत. पण यंदा मात्र लोकांची अडचण होऊ नये, म्हणून राज्य सरकारने ऑटो अप्रूव्हल प्रणाली राबवली. पण तिथेच घोटाळा झाला!
ट्रम्प, बच्चन यांचा पत्ता सेक्टर १७, चंदीगढ!
ई-पाससाठी आलेल्या ऑनलाईन अर्जांची पडताळणी करताना सरकारी कर्मचाऱ्यांना ७ मे रोजी आलेले दोन अर्ज वेगळे वाटले. पहिला अर्ज होता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने! त्यांच्या वडिलांचं नाव लिहिलं होतं मार्क जोन्स. डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्ता होता सेक्टर १७, चंदीगढ तर एका साध्या मोटार कारमधून या व्यक्तीला अत्यावश्यक कारणासाठी हिमाचल प्रदेशमध्ये यायचं होतं!
दुसरा अर्ज होता महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचा. यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव लिहिलं होतं हरबंसराय बच्चन! त्यांचाही पत्ता सेक्टर १७ चंदीगढ असा गिला होता. हिमाचलमध्ये त्यांना भेट घ्यायची होती राजीव सेहगल यांची! विशेष म्हणजे या दोन्ही अर्जांसाठी देण्यात आलेला आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक एकच होता!