केंद्राने २५ राज्यांमधील पंचायतींना
८९२३.८ कोटीचे दिले अनुदान
देशात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राकडून देखील पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने रविवारी २५ राज्यांसाठी मोठा निधी जाहीर केला. केंद्राने २५ राज्यांमधील पंचायतींना ८९२३.८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राला ८६१.४ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहेत. वित्त मंत्रालयाने शनिवारी ही अनुदान रक्कम राज्य पंचायतींसाठी जाहीर केली. हे अनुदान पंचायत, राज्यातील तीन स्तरांसाठी – गाव, गट आणि जिल्हा याकरिता देण्यात आली आहे. रविवारी वित्त मंत्रालयाने ही अनुदानाची रक्कम जाहीर केल्याची माहिती दिली.
हेमंत बिस्वा शर्मा
आसामचे मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपाने आसाममधील सत्तेत घरवापसी केली. आसाममध्ये भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचं निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार ? अखेर हे चित्र रविवारी स्पष्ट झालं. सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा यांनी बाजी मारली आहे.
महिला सैनिकांची
पहिली तुकडी दाखल
येथील लष्करी पोलिस केंद्र आणि विद्यालय (सीएमपी सी अँड एस) यांच्या वतीने ८ मे रोजी द्रोणाचार्य परेड मैदानावर ८३ महिला सैनिकांच्या पहिल्या तुकडीच्या अधिकृत प्रमाणन कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करत हा समारंभ साध्या स्वरुपात साजरा करण्यात आला. सीएमपी सेंटर अँड स्कूलचे कमांडंट यांनी कवायतीची पाहणी करताना अभ्यासक्रम नुकताच पूर्ण करणाऱ्या महिला सैनिकांचे त्यांनी निर्दोषपणे कवायती सादर केल्याबद्दल अभिनंदन केले.
सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर”
बनून मार्गदर्शन करा : मुख्यमंत्री
या सभेच्या प्रारंभी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.
कोरोना विषाणूचा प्रसार
हा हवेतूनच होतोय
कोरोना विषाणूचा प्रसार हा हवेतूनच होत आहे. आपण जेव्हा बोलतो त्यावेळी तोंडातून निघणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे अमेरिकेच्या सीडीसी संस्थेने म्हटले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने कोरोना विषाणूचा सर्वंकष अभ्यास करुन एक अहवाल तयार केला आहे. तोंडातून बाहेर पडणारे सूक्ष्म द्रव्य कण हे हवेत मिसळतात. तसेच ते आसपासच्या पृष्ठभागावर पडतात. त्यानंतर या सूक्ष्म द्रव्य कणांद्वारे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे सीडीसीने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात कर्फ्यू
१७ मे पर्यंत वाढवला
उत्तर प्रदेशात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान करोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपासून लागू करण्यात आलेला कर्फ्यू रविवारी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी दिली. देशातील सर्व राज्यांसमोर करोना संकटाचे मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी करोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही.
नाशिक मध्ये लहान मुलांसाठी
उभारणार कोविड सेंटर
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत देखील विविध पातळीवर काम करण्यात येत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाची तिसरी येणारी लाट लक्षात घेता त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने आताही साधन सामग्रीचे नियोजन केले जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे. आजाराने लहान मुले प्रभावित झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.
कैद्यांना 90 दिवसांची पॅरोल रजा
घेऊन घरी परतता येणार
सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक तुरुंगांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत न्यायालयाने तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने विविध निर्देश दिले. ज्या कैद्यांना गेल्या वर्षी कोरोना काळात पॅरोल आणि जामिनावर सोडून देण्यात आले होते, त्या कैद्यांना पुन्हा जामीन आणि पॅरोलवर तत्काळ सोडून देण्याचे निर्देश न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक कैद्यांचा तुरुंगातून घरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक कैद्यांना 90 दिवसांची पॅरोल अर्थात संचित रजा घेऊन घरी परतता येणार आहे.
मोदीजी लोकांना घर नको
श्वास द्या : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. करोनाची दुसऱ्या लाटेत उशिरा उपाययोजना केल्याने देशाला त्याची किंमत मोजावी लागली असा निशाणा ते वारंवार साधत आहेत. आजही राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.
कोयना धरण व परिसराला
भूकंपाचे दोन सौम्य धक्के
कोयना धरण व परिसराला शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल अशी नोंदली गेली. पहिला धक्का २.५५ मिनिटांनी तर, लगेचच ३ ते ४ मिनिटांच्या अंतराने भूकंपाचा आणखी एक सौम्य धक्का जाणवला.
भटक्या जनावरांच्या अन्नसाठी
ओडिसा देणार 60 लाखांचा निधी
करोना काळात उपासमार होत असलेल्या भटक्या जनावरांच्या अन्नसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांनी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. हा निधी ५ महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ अधिसूचित क्षेत्र परिषदेत देण्यात येणार आहे. यामुळे करोना काळात उपासमार होत असलेल्या भटक्या जनावरांची भूक भागणार आहे.
दिल्लीत लॉकडाऊन एक
आठवडा वाढवण्यात आला
दिल्लीत काळाबाजाराला देखील ऊत आला आहे. चढ्या किंमतीत वैद्यकीय उपकरणं आणि सेवा मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन एक आठवडा वाढवण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री, आमदार
करतात ऑक्सिजनचा काळाबाजार
ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या दिल्लीकरांपुढे आहेत. त्यात आता दिल्लीचे भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात, “दिल्लीतले लोक केवळ श्वासासाठी लढत आहेत, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसारख्या इतरही संघटना लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दिल्ली सरकारचे मंत्री आणि आमदार हे औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. या संकटाला दिल्ली सरकार, आम आदमी पार्टीचं जबाबदार आहे.”
अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन
नागपूरमधील विचरवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. एम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
गोलंदाज चेतन साकरियाच्या
वडिलांचे कोरोनामुळे निधन
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाच्या वडलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भावनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाख करण्यात आले होते. पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले.
SD social media
9850 60 3590