महाविकास आघाडीतील एका नेत्याच्या भूमिकेमुळे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले, अशा शब्दांत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. या निर्णयासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मतही शेंडगे यांनी व्यक्त केले.
ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी पदोन्नतीसंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले. पदोन्नती रोखण्याच्या निर्णयाचा फटका केवळ मागासवर्गीयच नव्हे तर धनगर आणि ओबीसी समाजालाही बसेल, असे शेंडगे यांनी म्हटले. मागासवर्गियांची पदोन्नती रोखण्याचा निर्णय कुठलीही कॅबिनेट बैठक न करता घेण्यात आला. हे साफ चुकीचं आहे. महाविकासआघाडीतील एका नेत्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा जीआर काढण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.
मराठ्यांच्या आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, या संभाजी राजे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण आजही अनेक मराठा नेते हे ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. हे योग्य नाही. याचा ओबीसी समाजाकडून तीव्र निषेध आणि विरोध करतो, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.