देशातील ‘ओमायक्रॉन’ची
रुग्णसंख्या शंभरावर
देशातील ‘ओमायक्रॉन’ची रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली असून केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत शुक्रवारी चिंता व्यक्त करीत खबरदारीचा इशारा दिला. गर्दी, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नववर्ष स्वागत कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
मुलांसाठी कोव्होव्हॅक्स लशीचा
वापर करण्यास मंजुरी
सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्होव्हॅक्स’ या करोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली. करोनाविरोधातील लढाईत त्यामुळे आणखी एका लशीची भर पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘कोव्होव्हॅक्स’च्या मुलांवरील आपत्कालीन वापरास परवानगी देण्याच्या निर्णयाचे ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा ‘न्गदग पेल जी खोर्लो’ (ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्याल्पो) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. याबद्दल मोदी यांनी भूतानच्या राजांचे आभार मानले आहेत. दोन्ही देशांचे संबंध दृढ राहतील तसेच भारत भूतानला शक्य ती सर्व प्रकारची मदत करेल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. भूतानचे पंतप्रधान लोटे शेरींग यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली. भूतानच्या विकासाचे प्रारूप हे शाश्वत असल्याचे कौतुक मोदींनी केले आहे. २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड केली होती.
अनेक सहकारी साखर कारखाने
नंतर खासगी होतात : अमित शाह
अनेक सहकारी साखर कारखाने नंतर खासगी होतात असं म्हणत त्यांनी सहकारी साखर कारखाने विकत घेऊन खासगी करणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले, “विठ्ठलराव विखे पाटलांनी दूरदृष्टीतून शेतकऱ्यांच्या विकासासाठी साखर कारखाना सुरू केला. हा साखर कारखाना आजही सहकारी पद्धतीने सुरू आहे याचा मला आनंद वाटतो. कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवला आहे आणि तो व्यवस्थितपणे चालवत आहेत याचा मला खूप आनंद आहे. आपला प्रेरणा स्त्रोत जपला गेलाय.
अजित पवार धनंजय मुंडे यांच्यावर
किरीट सोमय्या यांचे गंभीर आरोप
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब म्हणायचं. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर ३ बायका करून त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव दिल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला.
शिवसेनेचे नेते रामदास कदम ,
अनिल परब यांच्यात जुंपली
शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यातील वाद आज स्पष्टपणे उघड झाला आहे. कारण, रामदास कदम यांनी आज पत्रकारपरिषद घेत अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय, अनिल परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसेनेचा मतदारसंघ ते राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत. गद्दार मी नाही तर शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. असं रामदास कदम यांनी जाहीरपणे विधान केलं.
शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी
केली नव्या पक्षाची घोषणा
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनातील नेते आणि भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते गुरनाम सिंग चदुनी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चदुनी यांनी संयुक्त संघर्ष पार्टी या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचा हा नवा राजकीय पक्ष आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ११७ जागा लढणार आहे. असं असलं तरी ते स्वतः पंजाब विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
जुगार अड्ड्यावर छापा, माजी
आमदार रवी पाटीलला अटक
सोलापुरात होटगी रस्त्यावर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कर्नाटकातील माजी आमदार रवी पाटील यांच्यासह ३१ जणांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल संच व जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार अड्डा स्वतः रवी पाटील हे चालवित होते, असे पोलिसांनी सांगितले.
रवी शंकरप्पा पाटील (वय ६५, रा. वीरभद्र बंगला, सोरेगाव, सोलापूर) हे पोलिसांकडील नोंदीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
निधी राझदान यांच्यासह अनेक
महिला पत्रकार घोटाळेबाजांच्या रडारवर
माजी NDTV अँकर निधी रझदानसह भारतातील अनेक प्रमुख महिला पत्रकार आणि माध्यकर्मींना ऑनलाइन स्कॅमर्सनी हार्वर्डमध्ये प्रतिष्ठित नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन लक्ष्य केल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने नमूद केलं आहे. घोटाळेबाजांची ओळख अद्याप एक गूढ आहे. हार्वर्डला यासंदर्भात माहिती देऊन कारवाई करण्याचा इशारा देऊनही अद्याप याविरोधात कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये गौतम गंभीर
झाला संघाचा मार्गदर्शक
नवीन आयपीएल फ्रेंचायझी लखनऊने भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे. आयपीएलमध्ये गंभीर पहिल्यांदाच एखाद्या संघात मार्गदर्शक म्हणून सामील होणार आहे. अलीकडेच झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. क्रिकबझशी बोलताना, लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका म्हणाले, ”होय, आम्ही गौतम गंभीरला संघात मार्गदर्शक म्हणून सामील केले आहे.”
SD social media
9850 60 3590