कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचीच दहशत सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. याचे थेट परिणाम आता Miss World 2021 या सौंदर्यस्पर्धेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला या स्पर्धेसंदर्भात अतिशय मोठी माहिती समोर आली आहे. जिथं 23 स्पर्धकांना कोरोनाची लागण झाली आहे.
23 स्पर्धकांना कोरोना झाल्याचं निदान होताच आता स्पर्धेचा अंतिम सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. पण, अद्यापही पुढची तारीख काय, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
पुढच्या 90 दिवसांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते इतकीच माहिती सध्या देण्यात आली आहे.
Miss World 2021 या स्पर्धेमध्ये भारताकडून गेलेल्या मनसा वाराणसी हिलाही कोरोनाची लागण झाली आहे.
जगाच्या नजरा लागून राहिलेल्या Miss World 2021 या स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन प्यूर्टो रिकोच्या जोस मिगुएल एग्रेलॉट कॉलिजियम येथे होणार होतं. पण, या कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वीच कोरोनानं सारा गोंधळ घातला. स्पर्धेसंबंधितीच माहिती देणारं एक अधिकृत पत्रक यावेळी प्रसिद्ध करण्यात आलं. जिथं कोरोनाग्रस्तांना सध्या विलगीकरणात ठेवल्याची माहिती देण्यात आली.
पत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार स्पर्धेतील 97 सहभागी स्पर्धकांपैकी 23 जणींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही स्टाफ मेंबर्सनाही कोरोना झाल्याची बाब समोर आली आहे. एखाद्या जागतिक पातळीवरील स्पर्धेमध्ये असं संकट ओढावलं जाणं ही बाब सध्या अतिशय मोठा धक्का देणारी ठरत आहे.