निराधार महिलांना आधार देण्यासाठी रोहित पवार यांचा पुढाकार

कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाला गमवावं लागलेल्या महिलांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार धावून आले आहेत. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेकांच्या घरातील कमवत्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक महिला तसेच घरातील वयोवृध्द व्यक्ती निराधार झाले आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून विविध निर्बंध घालण्यात आल्याने काही भागात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या निराधार महिलांना घरबसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याकरिता रोहित पवार हे त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टीकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पवार हे स्वयं रोजगार निर्मितीसाठी स्वतः त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवणार असून या विषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थतर्फे करण्यात येणार आहे.

घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने अशा कुटुंबावर आलेलं संकटं मी समजू शकतो. याच जाणिवेतून कुटुंबातील निराधार महिलांच्या हाताला काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न दूर व्हावा याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत निराधार महिलांकरिता ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी रोजगार सहाय्य करण्यात येणार आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

तसेच कर्जत-जामखेडमधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ‘काळी बुरशी’ म्युकर मायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे 6 जून रोजी कर्जत येथे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.