देशभरात इंधनात लक्षणीय दरवाढ पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह सर्वच शहरात पेट्रोलच्या दराने शतक गाठलं आहे. तर डिझेलचे दरही 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये आज (31 मे) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीचा थेट परिणाम हा बाजारपेठांवर होताना दिसत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी भाज्यांचे दर हे गगनाला भिडले आहेत. तसेच पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका फळभाज्यांनाही बसला आहे. अनेक ठिकाणी भाज्यांचे दर हे 10 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोलच्या दराने शतक गाठलं आहे. आज पुणे शहरात पेट्रोलचा दर हा शंभरच्या पुढे गेला आहे. पुण्यात पेट्रोलचा दर हा 34 पैशांनी वाढला आहे. तर डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोल हे प्रतिलीटर 100.15 रुपये इतके झाले आहे. तर डिझेलचा दर हा 90.71 रुपये इतका आहे. त्याशिवाय मुंबईत पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोल हे 100.53 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने विकले जात आहे. तर मुंबईत डिझेलचा दर 92.50 रुपये एवढा आहे.
मे महिन्याआधी कित्येक महिने किरकोळ इंधन दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. पण 4 मेपासून सुरु झालेली इंधन दरवाढ सातत्याने कायम आहे. या महिन्यात आतापर्यंत 17 दिवसांत पेट्रोल प्रतिलीटर 3.88 रुपयांनी महाग झाले आहे. तर डिझेल प्रतिलीटर 4.42 रुपयांनी महाग झाले आहे. गेल्या रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. सध्या बऱ्याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर डिझेलची किंमत ही प्रतिलीटर 90 रुपयांच्या पुढे गेली आहे.