हंगामाच्या शेवटी कापसाचे दर 11 हजार रुपयांपर्यंत

हंगामाची सुरवात 6 हजार रुपये क्विंटलपासून सुरु झालेला कापूस आता अंतिम टप्प्यात 11 हजार रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. उत्पादनातील घट आणि वाढती मागणी यामुळे गेल्या 50 वर्षात जे झाले नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत झाले आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात विदर्भातील खरेदी केंद्रावर सर्वाधिक दर मिळत आहे. पण याचा नेमका फायदा शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे. कमी दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आता काही दिवसांमध्येच दर दुप्पट झाले आहेत.

त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला व्यापारी घरोघरी येऊन कापसाची खरेदी का करीत होते हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले असेल. वर्ध्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सेलू येथे तब्बल 10 हजार 900 प्रतिक्विंटल दर मिळाला होता. आता मोजक्याच शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. इतरांना मात्र, फरदडचा आधार घ्यावा लागत आहे.

विदर्भासह कापूस हे मराठावड्यातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे तोडणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचाच परिणाम संबंध हंगामातील दरावर राहिलेला आहे. बाजारपेठेत आवक घटल्यामुळे 6 हजारावरील दर आता जवळपास 11 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेले आहेत.

उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरामुळे भरुन निघालेली आहे. मात्र, असे असले तरी साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री झाल्यानंतर दर अधिक वाढत आहेत. त्यामुळे अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांचाच होत असल्याचे चित्र आहे.

नाही म्हणत..म्हणत शेतकऱ्यांनी फरदड कापासाचे उत्पादन नुकसानीचे असतानाही घेतलेच. बाजारपेठेतील वाढते दर आणि मुबलक पाणीसाठा यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी होताच पुन्हा कापसाला पाणी देऊन पीक घेतले आहे. फरदडमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव तर वाढतोच पण शेतजमिनही नापिक होते. हे सर्व माहित असून ही हंगामाच्या अंतिम टप्प्यातील दर पाहून शेतकऱ्यांनी आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळेच विदर्भात अजूनही कापूस उभाच दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.