शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर गोंधळाची शक्यता, भाजप सतर्क, महत्त्वाची बैठक
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: शिवसेनेच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री सर्व खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात व्यस्त आहेत. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील बैठकांवर बैठका घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही प्रचंड बैठका सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल तब्बल दोन तास बैठक झाली. ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी ही बैठक पार पडली. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना भाजपकडूनही आता हालचालींना वेग येताना दिसतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल त्यांच्या ‘सागर’ या निवासस्थानातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते गुजरातला एका गुप्त बैठकीसाठी जावून आल्याची चर्चा आहे. ही गुप्त बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातच्या वडोदरा येथे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यानंतर आता मुंबईत भाजपच्या गोटात आणखी घडामोडी घडत आहेत.
आता माफी नाही! शिवसेनेनं बजावला एकनाथ शिंदेंना समन्स
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. पण आता बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांना समन्स बजावला आहे.गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष आता कायदेशीर पेच प्रसंगात अडकला आहे.एवढंच नाहीतर 16 आमदारांना आज 5 वाजेपर्यंत नोटीस दिली जाणार आहे. मेलद्वारे नोटीस पाठवली जात आहे.आतापर्यंत 6 आमदारांना नोटीस पाठविण्यात आले आहे. लेखी पत्र आमदारांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.
बंडखोरी भोवणार, एकनाथ शिंदेंसह सर्व बंडोबा होणार बिनकामाचे मंत्री?
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. शिवसेनेनं आता ज्या बंडखोर शिवसेना नेत्यांना पदं दिली आहे, अशा सर्व नेत्यांना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर जे मंत्री आहेत त्यांनाही मंत्रिपदावरून काढण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. गुलाबराव पाटील ,शंभूराजे देसाई, अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही यात समावेश असणार आहे. त्यामुळे शिवसेनेची दिलेली मंत्रिपदावर आता बंडखोर नेत्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याची शक्यता आहे.
गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड गुजरात ATS च्या ताब्यात
गुजरात एटीएसच्या पथकाने गुजरात दंगल 2002 प्रकरणी मुंबईतील कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले असून त्यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आणले आहे. निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी तिस्ता यांची चौकशी करण्यात येणार आहे. तिस्ता सेटलवाड यांना अहमदाबादमध्ये आणले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
2002 च्या गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पंतप्रधान मोदींना विशेष तपास पथकाने दिलेल्या क्लीन चिटविरोधात झकिया जाफरी यांची याचिका फेटाळताना जोरदार टीका केली. त्याचवेळी गुजरात दंगलीतील तिस्ता सेटलवाड यांच्या भूमिकेबाबत सुप्रीम कोर्टाने अधिक चौकशीची मागणी केली होती. कायद्याशी खेळणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे
शिंदे गटाच्या अडचणींत वाढ! शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर
एकनाथ शिंदे यांनी उपसभापती आणि राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात शिवसेनेच्या 37 आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वतःची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह ‘धनुष्यबाण’ ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत.महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या या बैठकीत आज तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेणारे सर्व अधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे पहिल्या ठरावात म्हटले आहे.
दुसरा प्रस्ताव – बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही.
तिसरा प्रस्ताव- पक्षातील गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांनाही असतील. आतापर्यंत हे सर्व प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आले आहेत.
शरद पवार सरकार वाचवण्यात व्यस्त तर सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्यात व्यस्त
राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे मात्र तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे बारामती लोकसभा मतदारसंघ च्या खासदार सुप्रिया सुळे ह्या नेहमीच राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते शिवसेना आमदारांनी केलेली बंडखोरी राज्यात चर्चेचा विषय बनत असताना महाविकास आघाडी मधील महत्वाचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहे.
गुजरात दंगल प्रकरण : पंतप्रधानांना मोठा दिलासा
गुजरात दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गुजरात दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली.
मुंबईत तब्बल 7 लाख नव्या मतदारांची नांदी, सत्ता कुणाला द्यायची ते तरुण ठरवणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं बिगूल केव्हाही वाजू शकतं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते. मुंबई महापालिका गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण शिवसेनेला टक्कर देवून महापालिका काबीज करायची असा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय राष्ट्रवादी, काँग्रेसदेखील मुंबईत आपला विस्तार वाढवण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने रणनीती आखत आहे. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत तब्बल 7 लाख नव्या मतदारांची वाढ झाली आहे. नव्या मतदारांची एवढी मोठी वाढ पाहता मुंबई महापालिकेत सत्ता कुणाला द्यायची याचा फैसला तरुणदेखील घेऊ शकतात, असं चित्र आहे.
SD Social Media
9850 60 3590