ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे सेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आहेत. ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी यातून स्पष्ट दिसून येत आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत हे यातून दिसून येत आहे. पण या सर्वांनी आपण शिवसेना सोडलेली नाही, असं स्पष्टपणे सांगितलं देखील आहे.
नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?
“भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा..जात, गोत्र अन् धर्म अमुचा… शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!”, असं नरेश म्हस्के ट्विटरवर म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या राजीनाम्यातदखील हेच म्हटलं आहे. म्हस्के यांच्या राजीनाम्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ठाण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण केलं. श्रीकांत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केला. अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या आमदारांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. यावेळी नरेश म्हस्केंनी देखील शिवसैनिकांना इशारा दिला होता.