जोगम्मा घराण्याच्या ट्रान्सजेंडर लोकनृत्यांगणा आणि कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रान्सवुमन मथा बी मंजम्मा जोगती यांनी मंगळवारी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं.
राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मंजम्मा जोगती यांनी पारंपारिक पद्धतीने राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले. याचा व्हिडिओ एएनआयनं ट्विट केला आहे.
कोण आहेत मंजम्मा जोगती?
जोगती नृत्य, जनपद गीत आणि इतर कलाप्रकार टिकवून ठेवण्यासाठी मंजम्मा जोगती या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये जोगती नृत्य आणि जनपद गीतांची परंपरा अजूनही सुरु आहे.
मंजम्मा जोगती यांना सन २००६ मध्ये कर्नाटकातील जनपद अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर सन २०१० मध्ये कर्नाटक सरकारच्यावतीनं त्यांचा वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारानं गौरवही करण्यात आला आहे. ही कला आणि संस्कृती शिकून तिचं संवर्धन करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समाजाला केलं आहे.