आज दि.२९ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शरद पवार यांना युपीए
अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव

दिल्लीत आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवड करण्याची मागणी याआधीही झाली होती. त्यामुळे पवार यूपीएचे अध्यक्ष होणार का अशी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. महाविकासआघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी केल्यानंतर शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी याआधी ही अनेकदा झाली आहे.

पवारांनी आडनाव बदलून
आगलावे करावे : सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना आडनाव बदलून ‘आगलावे’ लावावं असा सल्ला दिला आहे. सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलं आहे.

हे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा
प्रकार : अमोल मिटकरी

शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत…तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा
डीए वाढण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेंशनर्ससाठी चांगली बातमी आहे. उद्या म्हणजेच बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत सरकार डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. याशिवाय 18 महिन्यांची थकीत डीए एरियरवर देखील निर्णय होऊ शकतो. बुधवारी 30 मार्च 2022 ला या आर्थिक वर्षातील शेवटची कॅबिनेट आहे. बैठकीत डीएमध्ये 3 टक्के वाढचा निर्णय होऊ शकतो.

सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे
ममता बॅनर्जी यांचे आवाहन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच, ”भाजपाने आपल्या देशाच्या सांघिक रचनेवर वारंवार हल्ला केला आहे आणि आता या जुलमी राजवटीचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे.” असे म्हणत त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

४६६ गैर-सरकारी संस्थांना
परवान्यांचे नूतनीकरण नाकारले

केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले की त्यांनी २०२० पासून ४६६ गैर-सरकारी संस्थांना (एनजीओ) फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) अॕक्ट (FCRA) अंतर्गत परवान्यांचे नूतनीकरण नाकारले आहे. कारण त्यांनी कायद्यातील पात्रता निकषांची पूर्तता केलेली नव्हती. यामध्ये २०२० मध्ये १००, २०२१ मध्ये ३४१ आणि या वर्षात आतापर्यंत २५ संस्थाना नकार देण्यात आला आहे. FCRA परवाना नूतनीकरणासाठी ऑक्सफॅम इंडियाचा अर्ज डिसेंबर २०२१ मध्ये नाकारण्यात आला होता.

शिवभोजन थाळी शौचालयात
धुण्याचा प्रकार यवतमाळ मध्ये उघड

यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामधील त्रुटी समोर आल्या आहेत. महागाव तालुक्यामधील त्रिमुर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून नवीन बस स्टॅण्डसमोर लावण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रावरील भांडी शौचालयामध्ये धुतली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

व्हाट्सअप वरून दोन जीबी
पर्यंत फाईल पाठवणे शक्य

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअॕप लवकरच अर्जेंटिनामध्ये “मीडिया फाइल साइज” वैशिष्ट्याची चाचणी सुरू करेल, जे वापरकर्त्यांना २ जिबीपर्यंत मीडिया फाइल्स शेअर करण्यास अनुमती देईल. हे वैशिष्ट्य सुरुवातीला अर्जेंटिनामधील बीटा परीक्षकांपुरते मर्यादित असेल आणि हे वैशिष्ट्य लवकरच इतर प्रदेशांमध्ये आणले जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

कुस्तीपटू सुशील कुमारच्या जामिनाला
दिल्ली पोलिसांचा विरोध

युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारच्या जामिनाला दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला आहे. जामिनावर सुटल्यास तो पळून जाऊ शकतो असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, सुशील कुमारचे परदेशात येणेजाणे असते, त्यामुळे त्याची सुटका झाली तर तो पळून जाऊ शकतो.

आणखी एका ग्लोबल कंपनीचं नेतृत्व भारतीयाकडे, राज सुब्रमण्यम यांची FedEx च्या CEO पदी नियुक्ती

ग्लोबल कंपन्यांच्या लीडर्समध्ये आणखी एका भारतीयाचे नाव जोडले जाणार आहे. आयआयटीयन आणि भारतीय अमेरिकन राज सुब्रमण्यम हे FedEx चे नवीन CEO असतील. अमेरिकन मल्टिनॅशनल कुरिअर डिलिव्हरी कंपनीने सोमवारी ही घोषणा केली. सुब्रमण्यम हे अध्यक्ष आणि सीईओ फ्रेडरिक डब्ल्यू स्मिथ यांच्यानंतर उत्तराधिकारी होतील, जे 1 जून रोजी पद सोडतील. ते आता कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असतील.स्मिथ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही पुढे पाहत आहोत. मला खूप समाधान आहे की राज सुब्रमण्यम यांच्या क्षमतेचा नेता FedEx ला खूप यशस्वी पुढे नेईल. CEO म्हणून, सुब्रमण्यम हे सर्व FedEx ऑपरेटिंग कंपन्यांना धोरणात्मक दिशा देण्यासाठी जबाबदार असतील. राज हे FedEx Express, FedEx Grund, FedEx Fret, FedEx Service, FedEx Office, FedEx Logistic आणि FedEx Dataworks चे व्यवस्थापन करतील.

पुण्यातील कात्रज परिसरात 20 गॅस सिलेंडरचे स्फोट

पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलेंडरचे स्फोट असल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट होत आहेत. या स्फोटांमुळे भीषण आगही लागली आहे. स्फोट होतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर आहे याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्तापर्यंत 20 सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती समजत आहे. या घटनेमुळे कुणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त नाहीये. मात्र, या स्फोटांच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

IPL मधून माघार घेणं खेळाडूंना पडणार महागात, BCCI चा दणका

आयपीएल लिलावामध्ये मोठी रक्कम मिळाल्यानंतरही स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूंची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे, पण आता खेळाडूंना अशाप्रकारे माघार घेणं महागात पडणार आहे. यासाठी बीसीसीआय नवीन योजना तयार करत आहे, ज्यामुळे खेळाडूंना मनमानी पद्धतीने आयपीएलमधून माघार घेता येणार नाही. फ्रॅन्चायजींसोबत चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत लिलावात मोठी रक्कम मिळाल्यानंतर खेळाडू माघार घेत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. ‘गव्हर्निंग काऊन्सिल फ्रॅन्चायजींसाठी प्रतिबद्ध आहे. बऱ्याच प्लानिंगनंतर एका खेळाडूवर बोली लागते, पण छोट्या छोट्या कारणांमुळे नाव मागे घेतलं जात असेल तर टीमची रणनिती फिस्कटते,’ असं गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने सांगितलं.

शेपूट पकडून ओढले आणि पोटात मारली लाथ, बिबट्याच्या जबड्यातून पत्नीने पतीला वाचवले

बिबट्याने जबड्यातील आपल्या पतीचे डोके सोडविण्यासाठी जीवाचीही पर्वा न करता अक्षरश: बिबट्याला ठोसे लगावून शेपूट आणि पाय ओढून पत्नीने पतीचा जीव वाचवल्याची थरारक घटना अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील दरोडी चापळदरा इथं ही घटना घडली. संजना पावडे असं या धाडसी पत्नीचे नाव आहे. गोरख पावडे असं बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत असणाऱ्या दरोडी चापळदरा भागात पावडे कुटुंब वास्तव्यास आहे. मध्यरात्रीची दोनच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरख हे पाहण्यासाठी गोठ्यात गेले. त्याचवेळी बिबट्याने गोरख यांच्यावर हल्ला केला.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.