वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) डिसेंबर २०२२ मधील महसूल संकलन १५ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटींवर पोहोचले. सुधारित उत्पादनाचे सुधारित प्रमाण आणि विनियोग मागणीतील वाढीचे हे निदर्शक आहे. तसेच हे या करविषयक नियमांचे चांगल्या अनुपालनाचेही निदर्शक आहे.
या करसंकलनापोटी महसूल १.४० लाख कोटींवर राहण्याचा डिसेंबर हा सलग दहावा महिना आहे. नोव्हेंबरमधील कर संकलन सुमारे १.४६ लाख कोटी होते.
अर्थ मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले, की डिसेंबर २०२२ मध्ये ‘जीएसटी’चा एकूण महसूल १,४९,५०७ कोटी संकलित झाला. यात केंद्रीय ‘जीएसटी’ (सीजीएसटी) २६ हजार ७११ कोटी, राज्याचा ‘जीएसटी’ (एसजीएसटी) ३३ हजार ३५७ कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आजीएसटी) ७८ हजार ४३४ कोटी (आयातीवर संकलित ४० हजार २६३ कोटींसह) आणि उपकरापोटी ११ हजार ५ कोटी (आयातीवर संकलित ८५० कोटींसह) एवढा महसूल संकलित झाला.
डिसेंबर २०२२ चा महसूल मागील वर्षी याच महिन्यात झालेल्या ‘जीएसटी’ संकलनापेक्षा १५ टक्के जास्त आहे, मागील वर्षी हा महसूल १.३० लाख कोटींच्या आसपास होता. या महिन्यात आयातीतून मिळणारा महसूल आठ टक्क्यांनी अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारापोटीचा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १८ टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ७.९ कोटी ‘ई वे बिले’ झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये जारी केलेल्या ७.६ कोटी ‘ई-वे बिलां’च्या तुलनेत लक्षणीय होती.
एप्रिलमध्ये ‘जीएसटी’पोटी सुमारे १.६८ लाख कोटींचे विक्रमी महसूल संकलन झाले होते. मेमध्ये सुमारे १.४१ लाख कोटी, जून (१.४५ लाख कोटी), जुलै (१.४९ लाख कोटी), ऑगस्ट (१.४४ लाख कोटी), सप्टेंबर (१.४८ लाख कोटी), ऑक्टोबर (१.५२ लाख कोटी) ), नोव्हेंबर (१.४६ लाख कोटी) आणि डिसेंबर (१.४९ लाख कोटी) एवढे संकलन झाले आहे.
राज्यात २००० कोटींनी वाढ
नोव्हेंबरच्या तुलनेत राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात सुमारे दोन हजार कोटींनी वाढ झाली आहे. राज्यात नोव्हेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कराचे २१,६११ कोटी रुपये संकलन झाले होते. या तुलनेत डिसेंबरमध्ये २३,५९८ कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. देशातील वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात वाढ झाली. तोच कल महाराष्ट्रातही बघायला मिळाला. तिमाही परतावा आणि वर्षांअखेर होणारे व्यवहार यामुळे संकलनात वाढ झाल्याचे वित्त विभागाचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात ऑक्टोबरमध्ये झालेल्या संकलनापेक्षा डिसेंबरमध्ये संकलनात वाढ झाली आहे.
महाराष्ट्र अव्वल
वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात महाराष्ट्र देशात कायमच आघाडीवरील राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक (१०,०६१ कोटी) तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात (९,२३८ कोटी) आहे.