महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना सोमवारपासून (२ जानेवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १२ जानेवारीपर्यंत राज्यातील विविध आठ केंद्रांवर पार पडेल.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना गेली २३ वर्षे या स्पर्धेसाठी प्रयत्नशील होती. अखेर या स्पर्धेला मुहूर्त सापडला असून, राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३९ क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून, राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी हे व्यासपीठ उभे करण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.
स्पर्धेत राज्यातील सर्वोत्तम आठ संघ सांघिक, तर सर्वोत्तम आठ खेळाडू वैयक्तिक प्रकारात सहभागी होतील. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारीला म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील , महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी विविध आठ केंद्रांवरून आलेल्या क्रीडा ज्योत एकत्र करून मुख्य मैदानावरील ज्योत प्रज्वलित करण्यात येईल.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासन मुख्य प्रायोजक असून एकूण १९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयोजनात कमतरता राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.