जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी धडाकेबाज कामगिरी करत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. प्राप्त माहितीनुसार शोपियांच्या मनिहाल गावात चार दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आलं. काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितलं की, ठार करण्यात आलेले दहशतवादी लश्कर ए तोयबा या संघटनेशी निगडीत होते. ही संयुक्त मोहीम भारतीय सेनेच्या ३४ आरआर, पोलीस आणि सीआरपीएफने मिळून यशस्वी केली. या मोहीमेत जवानांनी एके-47 रायफलसह तीन पिस्तूलं देखील हस्तगत केली आहेत.
मागील आठवड्यातच शोपियांमधील रावलपोरा येथे जवानांनी चकमकीत जैशचा कमांडर सज्जाद अफगानी याला ठार केलं होते. अफगानी जवळ आढळून आलेल्या चिनी बनावटीची ३६ काडतूसांनी जवानांना अधिकच सतर्क केले आहेत. यानंतर जवानांनी आपली वाहनं, बंकर्स आणि बुलेटप्रुफ संरक्षण अधिकच मजबूत केलं आहे. स्टीलची ही काडतूसं सामान्य बुलेटप्रुफ वाहनांना आणि जवानांच्या बुलेटप्रुफ जॅकेटला भेदण्याची क्षमता ठेवतात. यावर्षी एकूण १९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, त्यामध्ये ९ शोपियां जिल्ह्यात ठार करण्यात आले व दोन टॉप कमांडरचा देखील यामध्ये समावेश आहे.