प्रवास वर्णन
महाशिवरात्रीच्या त्या दिवशी आम्ही जळगावला दुपारी साडेतीन च्या गाडीने निघणार होतो. प्रत्यक्ष शंभू शंकराचे वास्तव्य असलेल्या काशी नगरीत लाखो लोकांच्या भक्तीला उधाण आले होते. भगवान विश्वनाथाच्या दर्शना साठी आधल्या दिवशी पासूनच ट्रक भर-भरून भाविक काशीनगरी पोहोचले होते. त्या दिवशी रस्त्यावर तुफान गर्दी असल्यामुळे रस्ता कुठूनही बंद होणार होता किंवा रिक्षा मिळणे सुद्धा अवघड होणार होते. त्यामुळे आमच्या ठिकाणाहून आम्ही अडीच तीन तास आधीच स्टेशनकडे निघालो. आम्ही आठ जणी दोन रिक्षांमधून स्टेशनवर पोहोचलो. दोन-तीन ओझेवाले हाताशी घेऊन सामानासह प्लॅटफॉर्म नंबर 9 वर आम्ही एकदाच येऊन हुश्श झालो. जागा मिळेल त्या ठीकाणी सर्वजणी बसल्या. मी मात्र सामानाच्या मधोमध बॅगांवर बसले, जरा स्थिरावले, चार-पाच दिवसांच्या सुखद क्षणांचा आढावा घेत होते.
तेवढ्यात…. तेवढ्यात भिंतीवरील आकर्षक चित्रांनी लक्ष वेधून घेतले. वाराणसीचे सुप्रसिद्ध सुरम्य घाट ,मंदिरं,गंगा आरती, विद्येच माहेर घर असलेले विश्वविद्यालय , संस्कृती आणि परंपरांचा ठेवा जतन करणारे प्रत्येक चित्र अतिशय बोलके होते. वाराणसीचा भौतिक, अध्यात्मिक, धार्मिक इतिहास सांगणारे होते. मनात आलं, चित्रातले काही दृश्य प्रत्यक्षपणे याची देही याची डोळा अनुभवायचे अहोभाग्य आपल्याला पण तर लाभले आहेच खूप धन्यता वाटली. तीन-चार महिन्यांपूर्वीच मैत्रिणीच्या सांगण्यावरून शिवतांडव स्तोत्राचा रोज वर्ग केला, कठीण शब्दांचे उच्चारण कळले, सराव होत गेला, सूर आणि ठेक्याच्या लयीत गाता गाता स्तोत्र सहजच मुखोद्गत झाले आणि वेध लागले स्तोत्र पठणाचे आणि तेही गंगा किनारी…
गंगाघाटाची ओढ
पाहता पाहता आमच्या जाण्याचे दिवस आले. आमचा उत्साहवर्धक प्रवास सुरु झाला. दुसर्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास आम्ही वाराणसीत पोचलो. पटापट आवरून अस्सी घाटावर गेलो. तेथे दुरूनच नजरेत भरले ते गंगेचे विशाल पात्र, उगवत्या सूर्य किरणांचे पाण्यातले प्रतिबिंब, गंगेच्या चकाकत्या जललहरी, त्यावर चालणाऱ्या नावा, आगबोटी, नदीपात्रात पोचण्यासाठी प्रत्येक घाटावर असलेल्या पायऱ्या दूरदूरपर्यंत दृष्टीस पडत होत्या. सकाळच्या वेळी स्नान ,संध्या ,पूजा आरती भजन करणारे साधू -पुजारी, स्त्रिया-पुरुष. योगा मेडिटेशन करणारे शंख- घंटानाद करणारे अवर्णनीय असा भक्तिमय सोहळा! इतकेच काय तर बनारस घराण्याची गायकी, नृत्याविष्कार मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिने गंगेला समर्पित करणारे कलाकार पाहतांना विश्वास बसला की एवढ्या शुद्ध भावाने या विशाल आणि विस्तीर्ण गंगेला आपली कला समर्पित करणारे कला साधक येथे आहेत आणि त्यामुळे या घराण्याचा विस्तार अबाधितच राहणार आहे.
गंगेची महाआरती डोळ्याचे पारणे फेडणारी
गोड आंबट मसालेदार गरमागरम लेमन टि चे फुरके घेत घाटाचे अतिशय नयनमनोहर दृश्य डोळ्यात टिपून घेत घेत, भैरवनाथांच्या मंदिराकडे आम्ही निघालो. कालभैरवनाथ म्हणजे काशी चा कोतवाल त्याच्या दर्शनाशिवाय विश्वनाथ दर्शनाची पूर्णता होत नाही असे मानले जाते. विश्वेश्वर गंज याठिकाणी असलेले हे मंदिर मुख्य रस्त्यापासून बरेच आत आहे .पायी जाताजाता भक्तांच्या रांगा नेमक्या कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात ? थांगपत्ताच लागत नाही. अरुंद रस्ते ,रस्त्याच्या दुतर्फा हार-फुलं, पूजासाहित्य आणि प्रसादाच्या दुकानांच्या रांगाच रांगा, भरपूर जनसमुदाय, प्रचंड गर्दी आणि या गर्दीतून वाट काढत गल्लीबोळातून मंदिराकडे जाण्याच्या रांगेत लागण्यास आमचा तब्बल एक तासाचा प्रयत्न …. निष्फळ ठरला. शेवटी प्रति कालभैरवाचे दर्शन घेऊन आम्ही गर्दीतून वाट काढत कशाबशा बाहेर पडून निवासाचे ठिकाणी पोहोचलो. तेथे जेवण-चहा- नाश्त्याचे कूपन, राहण्यासाठी उपलब्ध हाॅलच्या किल्ला ताब्यात घेतल्या. जंगमवाडी मठात दोन दिवस निवासासाठी होतो. त्याच दिवशी संध्याकाळी विश्वविख्यात दशाश्वमेध घाटावर गेलो. तिथे लाखो भाविकांची तुफान गर्दी , दिव्यांचा झगमगाट , प्रचंड घंटानाद , ढोल नगाड्याच्या तालावर तब्बल अर्धा तास पंचारतींनी होणारी गंगेची महाआरती हा विलोभनीय नयन सुखद सोहळा बघताना डोळ्याचे पारणे फिटल्या शिवाय राहत नाही. लखलखत्या सोनेरी दीपज्योती च्या तेजात रूपवती गंगेचे सौंदर्य बघतच रहावेसे वाटते. एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद घेऊन रात्री आम्ही निवासस्थानी पोचलो.
हजारो ज्योती प्रकाशित झाल्या
आठ तारखेला महिला दिनानिमित्त सकाळपासूनच भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन होते बनारस हिंदू विश्वविद्यालय बघणे हे त्या दिवसाचं आकर्षण होत. विशाल परिसरात स्थापित हे विश्वविद्यालय स्वतंत्र भवनातील भव्य ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रयागराजचे दंडदीक्षाधारी आद्य शंकराचार्य स्वामी श्री. वासुदेवानंद सरस्वती यांचे सानिध्य आम्हाला लाभले आपल्या अमृततुल्य वाणीतून मातृशक्तीचा मोठ्या आदराने शब्द सुमनांनी त्यानी गौरव केला आणि अल्पवेळातच उद्बोधन करून आमचा निरोप घेतला. संध्याकाळी अस्सी घाटावर शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने दुपारी चार वाजेपासून महिलांना बसने नेण्याची सोय होती. हजार महिलांना नियोजित जागेवर उभं करून हातात तुपाचया दिव्यांचे वाटप होईपर्यंत आकाशात मावळत्या सूर्याच्या तांबड्या छटा पसरल्या, गंगेच्या एका बाजूने सूर्य अस्ताला जात होता पाण्यात लाल तांबडे प्रतिबिंब आणि वर निरभ्र निळे पांढरे आकाश ,बघता बघता तिन्हीसांजा झाल्या आणि अंधार पसरायच्या आधीच हजारो ज्योती प्रकाशित झाल्या आहाहा! कुठल्या शब्दात या प्रसंगाचे वर्णन करावे? सर्व मातृशक्ती मातृहृदय भगिनीं आभाळ छायेत, धरणीमातेशी सलगी करत तिच्यात घट्ट पाय रोवत, हुलकावणी देणाऱ्या वाऱ्यापासून ज्योतीला आपल्या ओंजळीने कुरवळत स्थितप्रज्ञ. डोळ्यात न मावणारी गंगा अशा पंचतत्वाची समरस होऊन शिवशक्ती ला समर्पित होताना भाऊक झाल्या, गहिवरल्या. हे समर्पण इतकं खोल आणि इतकं निखळ होतं की आजू बाजूच्या मानवी शरीराचे काही क्षण भानच राहिले नाही. इतकी ती भावस्पर्शी आणि सुखद अनुभूती होती. स्तोत्र संपल्या नंतर अंगावर शहारे आणणारी कमालीची विलक्षण शांतता जणू ही आत्म्याची परमात्म्याशी भेट होती. हातातले दिवे एका बाजूला ठेवले.
विश्वनाथाचे दर्शन
त्याच रात्री बोटीत बसून आम्ही गंगेची महाआरती आणि तिच्या तटावरील असलेले रामघाट, हनुमान,तुलसी घाट, राजा हरिश्चंद्र, दरभंगा, शिवानी, अस्सी, दशाश्वमेध, मणिकर्णिका, केदार घाट पाहिले. प्रत्येक घाटाला पुरातन इतिहास आहे. प्रत्येक घाटांचे संस्कार, संकल्प आणि धार्मिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे. नऊ तारखेला पहाटे आम्ही विश्वनाथाच्या दर्शनाला निघालो हिंदूंच्या प्राचीन पुरातन मंदिराचा इतिहास असलेल्या या मंदिरात विश्वनाथाची जागृत मूर्ती आहे . मंदिरात सोन्या-चांदीचे खांब आणि सोन्याचा कळस तसाच्या तसाआहे. आक्रमणाच्यावेळी विश्वनाथांची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून मंदिरातल्या पुजाऱ्याने जवळच्या विहीरित शिवलिंग स्वरूप मूर्ती टाकून दिली त्यामुळे ती आजही जशीच्या तशी सुरक्षित आहे. विहीरिवर जाळी बसवलेली आहे त्यावरिल हार फुलांच्या प्रतिकात्मक मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक धन्य होतात. या विहिरीजवळ थोडा भाग सोडून जवळच अहिल्याबाई होळकरांनी विश्वनाथाच्या मंदिराची स्थापना केलेली आहे .कडक पोलिसांचा बंदोबस्त, प्रचंड गर्दी मंदिराचा कळस उंच उंच असला तरी गाभारा लांबी रुंदी उंची ला फारच कमी आहे त्यामुळे एकावेळी एक दोनच व्यक्ती दर्शन घेऊ शकतात.
देवी-देवतांची छोटी-मोठी बरीच मंदिर
मंदिराशेजारीच अनेक देवी-देवतांची छोटी-मोठी बरीच मंदिर आहे अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो आणि साधारण दुपारी साडे अकरा बारा वाजता नदीच्या दुसऱ्या किनारी असलेल्या रामनगर किल्ला बघायला. तुलसी घाटावरील हा अत्यंत प्राचीन दगडी भिंतींच्या किल्लाचे बांधकाम मोगल वास्तुशास्त्रानुसार आहे. येथे वेदव्यास मंदिर एक संग्रहालये आणि काशी नरेश निवासस्थान बघण्यासारखे आहे. दक्षिणेला दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे. संग्रहालयात अमेरिकन कार,जीप, रणगाडे, रत्न जडित, सोन्याचांदीचे आणि हस्तिदंताचे काम असलेल्या खुर्च्या, पालख्या, सोफे आणि मध्ययुगीन वेशभूषा बघायला मिळतात .फक्त वेळच नाही तर दिवस, आठवडा, महिना आणि खगोल शास्त्रीय माहिती देणारे अत्यंत दुर्लभ घड्याळ येथे संग्रही आहे. त्या काळातल्या राजे-महाराजे आणि राण्यांचे जरी च्या साड्या, विजार ,सदरे,चादरी, गोधड्या पायपोस तेथे संग्रही आहेत .लहान-मोठे रणगाडे, तोफा,ढाली तलवारी ,भाले ,बंदुकांचा ठेवा बघायला अडीच- तिनं तास लागतात ते बघून आम्ही सारनाथ स्तूभ बघायला गेलो.
साडी खरेदीचा किस्सा
निघायला संध्याकाळ झाली. साडी खरेदी चा किस्सा ऐकण्यासारखा आहे थोडक्यात सांगते. हॉटेल मालकाने आम्हाला सोबत एक माणूस दिला म्हणाला, ये आदमी ,आपको अच्छा वाला मार्केट दिखाएगा. आम्ही मजल दर मजल करत त्याच्या मागे अनेक छोटी मोठी दुकानं, शोरूम ,मार्केट एरिया पार करत करत बऱ्याच दूर दूर चालत गेलो. भैया,हमे कौन से मार्केट जाना है? और कितना दूर है? कब आयेगा मार्केट?असे एक ना अनेक प्रश्न विचारून आम्ही त्याला भंडावून सोडले पण तो…… तो बिचारा मालकाच्या हुकमाचा गुलाम होता . कुठलीच प्रतिक्रिया न देता एका गल्लीत आम्हाला घेऊन गेला. कल्पनेपलीकडले दुकान बघून आम्ही खूप नाराज झालो. दुकानात पोचायलाच इतका वेळ झाला होता की पुढे कुठलाच पर्याय नव्हता. आलोय तर बघून घेऊ साड्या …. दुकानदारा कपाटातून नाही तर गाठोड्यातून साड्या काढून दाखवत होता गाठोड्यातल्या साड्या? त्या काय आपल्याला आवडतील? पण झालं उलटंच…. अतिशय सुंदर रंग संगती, उत्तम जरी-बुट्टा, सिल्क मुलायम पोताच्या एकाहून एक माफक किमतीच्या सुरेख साड्या दुकानदाराने आम्हाला दाखवल्या..साड्यांची निवड आणि हिशोब चुकता करत बाहेर पडलो. गेल्या तीन-चार दिवसात जिथे एखादी महिला किंवा मुलगी नजरेस पडली नव्हती तिथे रात्री अकरा वाजता आम्ही कपडागल्लीतून बाहेर पडत होतो. माणसांची वर्दळ होती. भीती वाटत नव्हती उशीर झाल्यामुळे दोन रिक्षांच्या भानगडीत न पडता अडचणीत एकमेकींना सांभाळत, कोंबत, दणके खात ,कसरत एंजॉय करत एका तीन सिटर रिक्षाने आमच्या ठिकाणी पोहोचलो.
श्रीरामांचे दर्शन घेताना डोळे पाणावले
सकाळ अयोध्ये साठी आम्हाला निघायचे होते.श्रीराम जन्मभूमी बघायची वेगळीच ओढ आणि उत्सुकता होती.पोचल्या पोचल्या शरयू नदीच्या शांत निर्मळ, स्वच्छ थंडगार पाण्यात आम्ही आमचे तळवे ओले केले. हनुमान घाटी,सितेची रसोई ,दोनतिन मंदीरं बघून जिथे श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले जाणार ती जागा, जागेच्या जरा दूर एका उंच चबुतऱ्यावर एका सुबक देव्हाऱ्यात लक्ष्मण सीता माई आणि हनुमंतासह प्रभु श्रीरामांची मुर्ती दर्शनासाठी स्थापित केलेली आहे. पोलिसांचा जागता पहारा कडक बंदोबस्त प्रत्येकाचे किमान चार चार वेळा चेकिंग दिव्य पार करत श्रीरामांचे दर्शन घेताना डोळे पाणावतात, गहिवरून येतं. चौदा वर्षांच्या वनवासानंतर आयुष्यभर ज्याच्या वाट्याला सुख कधी आलंच नाही त्या श्रीरामांच्या मंदिरासाठी सुद्धा केवढे विघ्न यावेत? मन खूप दुःखी झाले. रामराया आता तरी लवकरात लवकर मंदीर बांधकाम निर्विघ्नपणे पूर्णत्वास न्या. अशी मनोमन प्रार्थना करत श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत भूमीला नतमस्तक होऊन आम्ही निरोप घेतला आणि रात्री अकरा वाजता वाराणसीत पोचलो या सर्व आठवणी मनाला खूप आनंद देत होत्या.
या पवित्र भूमीचा स्पर्श पुन्हा कधी मिळणार? तेवढ्यात गाडीचा जोरदार भोंगा वाजला पाच दिवसांच्या आठवणीत रमलेली मी आता परतीच्या प्रवासाला निघाले होते. भरपूर ज्ञान, अध्यात्मिक वृत्तीचा ठेवा आणि सकारात्मक शक्ती चा अनुभव घेऊन. माझ्या दोन्ही लाडक्या लेकी आणि माझ्या अतिशय जिवाभावाच्या मैत्रिणी सोबत होत्या.प्रत्येक क्षण कॅमेरा टिपून घेत ही गंगा यात्रा मी खूप एन्जॉय केली.
सौ. अंजली हांडे, जळगाव
Khup sundar