जन्म. २२ मार्च १९७६ मुंबई येथे.
स्टॅण्ड अप कॉमेडी करणा-या मराठी कलाकारांपैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. विशाखा या माहेरच्या विशाखा शिंदे. विशाखा या मुळच्या ठाण्याच्या. कळवा येथे त्यांचे माहेर आहे. येथेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. प्रारंभी त्या अंबरनाथला राहात असत. तिथून त्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये दररोज चित्रीकरणासाठी येत असत. सुरुवातीच्या काळात त्यांनी नृत्य शिक्षिकेपासून इतर काही नोकऱ्या केल्या. कलाक्षेत्रामध्ये संधी मिळवण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी खूपच धडपड केली. विनोदी भूमिका
साकारण्यात हातखंडा असलेल्या विशाखा यांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ ‘कॉमेडी सर्कस’ या सारखे विनोदी कार्यक्रम गाजवले आहेत. मराठी चित्रपट आणि नाटकं सोबतच अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे. त्यामध्ये ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’ आणि ‘का रे दुरावा’ यासारख्या मालीकांचा समावेश आहे. विशाखा सुभेदार यांनी ‘का रे दुरावा’ या मालिकेत नंदिनी ही थोडीशी गंभीर छटेची भूमिका साकारली होती. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत सासू चा स्वयमवर, 66 सदाशिव, येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 2, दगडाबाईची चाळ, अरे आवाज कुणाचा, 4 इडीयट्स, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, झपाटलेला टू, बालक पालक, सुपर नानी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, हृदयांतर, फक्त लढ म्हणा यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. सध्या विशाखा सुभेदार या समीर चौगुले यांच्या सोबत सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमांमध्ये काम करत आहे. या सर्वाबरोबरच विशाखा सुभेदार यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. विशाखा सुभेदार यांनी एका सामाजिक उपक्रमाची जबाबदारी घेत ५० वर्षांपुढील कलाकारांसाठी ‘स्वामीधाम कलाश्रय’ निर्माण केले आहे. १९९८ मध्ये अभिनेते आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखा यांचे लग्न झाले. महेश सुभेदार हे इंजिनिअरसुद्धा आहेत. लग्नानंतर त्या अंबरनाथला शिफ्ट झाल्या. विशेष म्हणजे लग्नानंतरच विशाखा यांना अभिनेत्री म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. महेश आणि विशाखा यांचा एक मुलगा असून अभिनय हे त्याचे नाव आहे. विशाखा सुभेदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे
संदर्भ. इंटरनेट