आज नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांचा जन्मदिन

जन्म. २२ मार्च १९७२
अश्विनी एकबोटे या माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन या नाटकात काम केले होते. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एम.ए केले होते.
उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्या अभिनय आणि नृत्यक्षेत्राकडे वळल्या. अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्य ही शिकल्या होत्या. त्या पुण्यातील कलावर्धिनी नृत्यसंस्थेच्या कोथरूड शाखेच्या प्रमुख होत्या. देबू, महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, डंक्यावर डंका, आरंभ, क्षण हा मोहाचा, कॉफी आणि बरंच काही अशा मराठी चित्रपटांसह ‘एक पल प्यार का’ या हिंदी सिनेमातूनही त्यांनी भूमिका केली होती.
त्या तिघांची गोष्ट, एका क्षणात, नांदी ही गाजलेली नाटके त्यांनी रंगमंचावर साकारली. दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या. अश्विनी एकबोटे यांनी झी २४ तासच्या अनन्य सन्मान या कार्यक्रमात खास अँकरिंग केले होते. अश्विेनी यांचे पती प्रमोद एकबोटे पुणे फायर ब्रिगेडमध्ये वायरलेस डिपार्टमेंटचे सिनियर रेडिओ टेक्निशियन आहेत तर मुला शुभांकर एकबोटे अभिनयात करियर करीत आहे.अश्विनी एकबोटे यांचे २२ ऑक्टोबर २०१६ रोजी सहज संस्थेतर्फे ‘नाट्य त्रिविधा’ या कार्यक्रमाचा पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी शुभारंभाचा प्रयोग होता. या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे यांनी काही गीतांवर नृत्य सादर केले होते. शेवटी त्या ‘संगीत बावनखणी’ नाटकाच्या भैरवीवर नृत्य करण्यासाठी रंगमंचावर आल्या. प्रसिद्ध गायिका रेवा नातू आणि चिन्मय जोगळेकर यांनी नाट्यगीत सादर केले. त्यावर नृत्य करीत असताना तिहाई घेतल्यावर अश्विनी रंगमंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने पेरुगेटजवळील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच नऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ. इंटरनेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.