सहा तासांच्या उपचारानंतर सलमान खानला मिळाला डिस्चार्ज

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला सर्पदंश झाल्याचं वृत्त रविवारी सकाळी आलं आणि चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी झालेल्या या घटनेमुळे सलमानचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातही धाकधूक वाढली होती. मात्र चाहत्यांच्या लाडक्या भाईजानला सहा तासांच्या उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सर्पदंश झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे वाढदिवशी सलमानने मीडियाशी संवाद साधताना आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची भयावह आठवण सांगितली.

“माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता, मी काठीने त्याला बाहेर काढले. हळूहळू तो माझ्या हाताजवळ आला. मी त्याची सुटका करण्यासाठी त्याला पकडलं, त्यावेळी त्याने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मला 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मी आता ठीक आहे” अशी माहिती खुद्द अभिनेता सलमान खानने दिली आहे. सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं, असंही तो गंमतीत म्हणाला.

सलमान खानचा आज 56 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलमधील फार्महाऊसवर गेलेल्या सलमानला आदल्याच दिवशी साप चावला होता. त्यानंतर सलमानला नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) काही तास उपचारासाठी थांबावं लागलं होतं. ज्या सापानं दंश केला होता, त्यालाही पकडण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलाय, त्या पनवेलमधील फार्महाऊसचा परिसर हा झाडाझुडपात आहे. त्यामुळे तिथे किडे, सरपटणारे प्राणी, विंचू, साप असणं स्वाभाविक असल्याचं सलमानचे पिता आणि प्रख्यात लेखक सलीम खान यांनी म्हटलं. त्यामुळे अशाप्रकारच्या छोट्या-मोठ्या गोष्टी या इथं होतच असतात, त्याचं नवल वाटावं, असं काही घडलेलं नाही, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे, सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी या अपार्टमेंटबाहेर केक कापून चाहत्यांनी त्याचा बर्थडे साजरा केला. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आहे, तरी सलमान खानच्या घराबाहेर फॅन्सनी एकत्र येत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. पोलिसांना माहिती पडतात सलमान खानच्या घराबाहेर जमलेल्या सर्व चाहत्यांना पोलिसांनी हटवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.